उरण परिसरात जेएनपीटी बंदरातील आयात-निर्यातीच्या व्यवसायात गेल्या अनेक वर्षांपासून वाढत्या तस्करीचे प्रकार उघडकीस येत असून या तस्करीतून टोळी युद्ध होण्याची भीती येथे व्यक्त करण्यात येत आहे. बंदरातील ही तस्करी रोखण्यासाठी स्कॅनरमध्ये वाढ केल्यास या तस्करीला आळा बसू शकेल; परंतु त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने तस्करी प्रकारात वाढ होत आहे.
जेएनपीटी बंदर हे देशातीलच नव्हे तर अशिया खंडातील अत्याधुनिक बंदर आहे. जेएनपीटीसह येथील दोन खासगी बंदरातून वर्षांकाठी ४० ते ४५ लाख कंटेनरची हाताळणी केली जाते. या मालाची ने-आण करण्यासाठी उरण परिसरात ६०पेक्षा अधिक आयात-निर्यातीच्या मालाची साठवणूक करणारे गोदाम आहेत. गोदामातून मालाची निर्यात करण्यापूर्वी सीमा शुल्क विभागाकडून त्यांचे स्कॅनिंग करण्यात येते.
मात्र एकच मशीन असल्याने अनेक दिवस स्कॅनिंगसाठी रांगेतच उभे राहावे लागते, तर आयात होणाऱ्या मालाचे कंटेनर जहाजातून उतरल्यानंतर बंदरातच स्कॅन केले जातात. या स्कॅनरचीही संख्या कमी असल्याने संशयित असलेल्याच कंटेनरची तपासणी केली जाते. त्यामुळे बंदरातील सर्व कंटेनरची तपासणी होत नसल्याने तस्करी करणाऱ्यांचे फावले आहे.
आतापर्यंत जेएनपीटी बंदरातून सर्वात अधिक रक्तचंदन, काडतुसे, विदेशी दारू, वन्यप्राण्यांची कातडी, चरस, गांजा, अफू आदींची तस्करी झाली आहे. मागील अनेक वर्षांत सर्वात अधिक तीनशे टनापेक्षा अधिकच्या रक्तचंदनाची तस्करी उघड झाली आहे, तर ऑइलच्या ड्रममधून आलेली काडतुसे यांचाही समावेश आहे. मात्र याबाबत कोणतीही खबरदारी घेतली जात नसल्याने या तस्करीतून भविष्यात मोठा घातपात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.