महानगरपालिका उपकर उपायुक्तांकडे बदनामकारक बातमी छापण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून आणि त्यांच्या सहकाऱ्याकडून १४ लाखांची खंडणी मागणाऱ्या पत्रकाराला खंडणीविरोधी पथकाने मंगळवारी अटक केली आहे. खंडणीच्या रकमेपकी एक लाख रुपये घेण्यासाठी उपकर कार्यालयात आलेला हा पत्रकार खंडणी पथकाच्या सापळ्यात अडकला. त्याच्या विरोधात कोपरखैरणे पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनकर सोनकांबळे असे या अटक केलेल्या खंडणीखोर पत्रकाराचे नाव आहे. एका साप्ताहिकाचा तो मालक संपादक आहे. पालिका उपायुक्त सुधीर चेके व त्यांचे सहकारी दत्तात्रय नांगरे, विलास समलुष्टे यांना तो बदनामकारक बातमी छापण्याची धमकी देत होता. बातमी न छापण्यासाठी त्याने त्यांच्याकडे १४ लाख रुपयांची मागणी केली होती. याप्रकरणी महानगरपालिका उपकर विभागाचे उपायुक्त चेके व दत्ता नागरे यांनी खंडणी विभागाकडे याबाबतची तक्रार दिली होती. या तक्रारीवरून खंडणीविरोधी पथकाने मंगळवारी कोपरखैरणे येथील उपकर कार्यालयात सापळा लावला होता. यावेळी सोनकांबळे हा १४ लाख रुपयांपकी एक लाख रुपयांची रक्कम घेण्यासाठी कार्यालयात आला होता. यावेळी एक लाखांची रक्कम स्वीकारताना त्याला अटक करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या पत्रकाराने आपल्या नियतकालिकात अनेक अधिकाऱ्यांचा पर्दाफाश करण्याची धमकी देऊन लाखो रुपये वसूल केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. मुख्यालयात बसणारे उपायुक्त जगन्नाथ सिन्नरकर, शहर अभियंता मोहन डगांवकर, सहशहर अभियंता जी. व्ही. राव, कार्यकारी अभियंता संजय देसाई या मुख्यालयातील अधिकाऱ्यांना बदनामी करण्याची धमकी दिल्यानंतर या पत्रकाराने आपला मोर्चा पालिकेची आर्थिक बलस्थाने असणाऱ्या मालमत्ता, एलबीटी आणि नगररचना विभागाकडे वळविला होता.  उपायुक्त सुधीर चेके यांच्याकडे १४ लाख रुपयांची खंडणी मागितल्याने हा पत्रकार पोलिसांच्या जाळ्यात सापडला.  त्याच्याकडे टोयाटोची लेक्सास प्रकारातील अलीशान गाडी असल्याचे आढळून आले असून ती जप्त करण्यात आली आहे. हा पत्रकार पालिकेतील एका अधिकाऱ्याच्या दालनात बसून दुसऱ्या अधिकाऱ्यांना ब्लॅकमेलिंग करीत असल्याची बाब पुढे आली आहे. यापूर्वी तो एका पदाधिकाऱ्याचे दालन वापरत होता. ते नंतर त्याच्यासाठी बंद करण्यात आले. सोनकांबळे याने अशा प्रकारे किती अधिकाऱ्यांना खंडणीसाठी धमकावले आहे, याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.  हे अधिकारी या पत्रकाराला का इतकी वर्षे पोसत होते ते उघड होणार आहे.
दहा वर्षांपूर्वी नवी मुंबईतील डोंगराच्या पायथ्याशी पेट्रोल-डिझेल भेसळीचे अनेक अड्डे होते. त्या ठिकाणी खंडणीबहाद्दर पत्रकारांची नित्यनियमाने हजेरी लागत होती, असे पोलीस सांगतात. पत्रकाराच्या पात्रतेनुसार तशी पाकिटे त्यांना दर महिन्याला दिली जात होती. यात मुंबईतील अनेक पत्रकारांचा समावेश होता. अड्डय़ाबरोबरच नवी मुंबईतील पत्रकारांबरोबरच मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पनवेल येथील पत्रकार नवी मुंबईतील डान्सबार ठिकाणांना वारंवार भेटी देत होते. भेसळ व डान्सबार उद्ध्वस्त झाल्यानंतर या खंडणीबहाद्दर पत्रकारांनी नवी मुंबई पालिकेकडे आपला मोर्चा वळविला आहे.