ज्येष्ठ पत्रकार वसंत आत्माराम मोरे यांचे सोमवारी दुपारी मुंबईत वेसावे येथे निवासस्थानी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन पुत्र आणि दोन मुली असा परिवार आहे. मोरे यांनी १९४८ मध्ये राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या ‘कामगार’ या साप्ताहिकामधून पत्रकारितेची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी ‘दैनिक चित्रा’, ‘मराठा’, ‘नवशक्ती’, ‘शिवनेर’ मध्येही काम केले. मंदा पाटणकर खून खटल्याचे त्यांनी केलेले वार्ताकन त्यावेळी गाजले होते. गुन्हेगारी विषयावरील त्यांची दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. मुंबई मराठी पत्रकार संघाने २००३ मध्ये त्यांना ‘आचार्य अत्रे पुरस्कार’ देऊन गौरविले होते.