कोकणातील हापूस आंब्याची लागवड आजच्या घडीला राज्याच्या कानाकोपऱ्यात केली जात आहे. सोमवारी छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या काही गावातून जुन्नरी हापूस आंबा तुर्भे येथील एपीएमसीच्या फळबाजारात दाखल झाला आहे. कोकणासारखीच असलेली लाल माती आणि खडकाळ जमिनीमुळे या आंब्यानेही कोकणातील हापूस आंब्याचा रंग धारण केला आहे. त्यामुळे कोकणी हापूस आंब्याला आता पश्चिम महाराष्ट्रातील हापूस आंब्याशीही स्पर्धा करावी लागणार आहे. दरम्यान कोकणातून सोमवारी सर्वाधिक ८० हजार पेटय़ा हापूस आंबा आल्याची नोंद आहे. या हंगामातील ही सर्वाधिक मोठी आवक असून यानंतर इतकी मोठी आवक येण्याची शक्यता कमी आहे.
कोकणातील हापूस आंब्यावर या वर्षी अस्मानी संकट कोसळले आहे. त्यामुळे आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास अशी स्थिती हापूस आंब्याची झाली आहे. अवकाळी पाऊस, गारपीट, उन्ह-थंडीचा खेळ यामुळे हापूस आंब्याचा मोहर फळधारणा होण्याअगोदर गळून पडला. या नैसर्गिक बदलामुळे हापूस आंब्याला करपा, तुडतुडा यांसारख्या रोगांनी त्रासले आहे. त्यामुळे वरून चांगला दिसणारा हापूस आंबा आतून कसा निघेल याचा नेम नसल्याने कोकणातील हापूस आंबा बागायतदारांची या वर्षी आर्थिकदृष्टय़ा कंबर मोडून गेली आहे. नेपाळमधील महाभूकंपानंतर हवामानाचे काही खरे नसल्याने हाताशी आलेला आंबा काढून बाजारपेठेत पाठविण्याची अहमहमिका सध्या सुरू आहे. त्यामुळे आता हापूस आंब्याची आवक वाढू लागली आहे. सोमवारी चक्क ८० हजार पेटय़ा हापूस आंबा बाजारात आलेला आहे. ही या मोसमातील सर्वाधिक आवक आहे. त्यामुळे हापूस आंब्याचे दरही येत्या आठवडय़ात आवाक्यात राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या महिन्याच्या मध्यापर्यंत हापूस आंब्याचा मोसम संपणार असल्याची चिन्हे दिसू लागली असल्याचे संजय पानसरे यांनी स्पष्ट केले. कोकणातील हापूस आंब्यानंतर येणारा जुन्नरचा हापूस आंबादेखील या वर्षी लवकर आला आहे. निसर्गाच्या भीतीने येथील बागायतदारांनी काही प्रमाणात लावलेला हापूस आंबा बाजारात पाठविण्यास सुरुवात केली आहे. जुन्नर पट्टय़ात सुमारे ५० हजार हापूस आंब्याच्या झाडांची लागवड झाली आहे. कोकणच्या जमिनीशी तुलना होणारी जमीन मावळ व जुन्नर पट्टय़ात आहे. तेथील कसूर नावाच्या गावातील परदेशी या बागायतदाराने सोमवारी ४० पेटय़ा हापूस आंबा तुर्भे येथील घाऊक बाजारात पाठविला आहे. कोकणातील हापूस आंब्यासारखा दिसणाऱ्या या आंब्यालाही चांगली मागणी आहे. जानेवारी महिन्यात काही किरकोळ पेटय़ा जुन्नरहून आल्या होत्या, पण मुबलक आंबा आता येऊ लागला आहे. तो कोकणातील हापूस आंब्याला स्पर्धक ठरणारा आहे. याच महिन्यात गुजरात हापूस आंब्याची आवक सुरू होणार आहे. यंदा आवक कमी असल्याने भाव जास्त आहेत. त्यात आंबा कसा निघेल याचा नेम नसल्याने खवय्ये जपून आंबे खात आहेत. सोमवारी आवक वाढल्याने दर गडगडणार असल्याचे दिसून येत आहे.