जिल्हा विधीसेवा प्राधिकरणच्या वतीने ‘न्याय आपल्या दारी’ योजने अंतर्गत उद्यापासुन (सोमवार) जिल्ह्य़ातील सर्व तालुक्यांतील एकुण ३९ गावांत फिरते लोकन्यायालये आयोजित करण्यात आली आहेत. एक महिन्याच्या कालावधीत ही लोकन्यायालये गावपातळीवर होतील.
प्राधिकरणचे सचिव आनंद पाटील यांनी ही माहिती दिली. फिरते लोकन्यायालय एका सुसज्ज वाहनाच्या स्वरुपात आहेत. या वाहनातच कोर्ट हॉल, न्यायाधिश, दोन वकिल, लघुलेखक, शिपाई असेल. हे वाहन रोज एक, दोन गावात जाईल, तेथे ग्रामपंचायत कार्यालय किंवा सार्वजनिक ठिकाणी लोकन्यायालयाचे काम सुरु करेल. सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० असे कामकाज चालेल. सायंकाळी त्याच गावात कायदेविषयक जनजागृतीचा कार्यक्रम होईल.
या लोकन्यायालयात फौजदारी व दिवाणी अशा दोन्ही खटले चालतील. तडजोडीने वाद मिटवता येतील, असे संबंधित गावातील खटले या लोकन्यायालयाकडे पुर्वीच वर्ग करण्यात आले आहेत, त्यातील पक्षकार, त्यांचे वकिल यांना नोटिसाही पाठवल्या गेल्या आहेत. न्याय आपल्या दारी योजनेमुळे पक्षकार, वकिल यांच्या वेळ, पैशाची मोठी बचत होणार आहे.