उद्या मुंबईहून अमेरिकेसाठी रवाना
जगातील सर्वात कमी उंचीची महिला म्हणून ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नाव नोंदवणाऱ्या नागपूरच्या ज्योती आमगे हिने भारतीय आणि जागतिक पातळीवरील ‘रिअ‍ॅलिटी शो’मध्ये कामे केली असून आता ती अमेरिकेतील लॉस एंजिल्सला ‘हॉरर शो’मध्ये काम करणार आहे. त्यासाठी ती दोन महिने तिथेच राहणार आहे. ज्योतीने यापूर्वी जागतिक पातळीवर अनेक शो आणि मालिकांमध्ये कामे केली असली तरी हा ‘हॉरर शो’ तिच्यासाठी नवा अनुभव राहणार आहे आणि त्यासाठी ती १ ऑगस्टला मुंबईवरून रवाना होणार आहे.
फॉक्स प्रॉडक्शन या कंपनीशी ज्योतीने करार केला असून कमीत कमी दोन महिने आणि जास्तीत जास्त चार महिने तिला त्या ठिकाणी राहावे लागणार आहे. त्या मालिकेमध्ये ज्योतीला कुठली भूमिका मिळणार याची तिला माहिती नाही. मात्र, एका ‘हॉरर शो’मध्ये काम करायचे असल्यामुळे ती आनंदात आहे. मूर्ती लहान पण किती महान असलेल्या ज्योतीने यापूर्वी कधीच अभिनय केला नाही. तिला चित्रपटात काम करण्याच्या अनेक संधी आल्या. मात्र, अभिनयाचे अंग नसल्यामुळे तिने काम केले नाही. कमी उंचीमुळे ज्योतीचे आयुष्य हे सर्वसाधारण व्यक्तीसारखे नाही. तिला सोफ्यावरसुद्धा स्वत:हून बसता येत नाही. कुठेही बाहेर जायचे असेल तर तिला कडेवर घेण्याशिवाय पर्याय नसतो. मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी आली असता ती स्वत: मतदान केंद्रावर कुणाचाही आधार न घेता चालत आली होती. ज्योती आज २० वषार्ंची असून परिवारातील सदस्य तिला बाळासारखे जपत आहेत.
२ फूट ६ इंच उंची असलेली ज्योती जगात प्रसिद्ध असून तिने नुकतीच १२ वीची परीक्षा उत्तीर्ण केली. ती नागपूरच्या व्हीएमव्ही महाविद्यालयात प्रथम वर्षांला आहे. खूप शिकण्याची इच्छा असल्यामुळे वेळ मिळेल तेव्हा ती अभ्यास करीत असते.
सामान्य मुले किंवा मुलींना महाविद्यालयात किंवा बाहेरही जशा सोयी सुविधा दिल्या जातात तशाच सोयी सुविधा मलाही देण्यात आल्या तर माझी काही हरकत नसल्याचे ज्योती म्हणाली.
अभ्यासात हुशार असलेली ज्योती अनेकांशी संवाद साधताना आपण इतरांपेक्षा वेगळे आहो याचे तिला दुख नाही. एकेकाळी अतिशय हलाखाची परिस्थिती असलेले तिचे कुटुंब आज बऱ्यापैकी स्थिरावले आहे. तिला चार बहिणी आणि एक भाऊ असून घरात ती सर्वात छोटी आहे.
मोठय़ा बहिणीचे लग्न झाले. वडिलांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. तिचा जन्म झाल्यावर काही वर्षांनी तिची उंची वाढावी यासाठी परिवारातील सदस्यांनी अनेक प्रयत्न केले. मात्र, ते शक्य झाले नाही. तिने केवळ परिवाराचे नाही तर या शहराचे आणि पयार्याने भारताचे नाव मोठे केले आहे.
संवाद साधला असता तिने सांगितले, आजपर्यंत अनेक देशात जाऊन रिअ‍ॅलिटी शो किंवा कार्यक्रमात सहभागी झाली आहे. मात्र, ‘हॉरर शो’मध्ये काम करण्याची संधी प्रथमच मिळाली आहे त्यामुळे छान वाटत आहे. तिथे किती दिवस राहावे लागेल हे निश्चित सांगता येत नसल्यामुळे अभ्यासाची पुस्तके घेऊन जात आहे. यापूर्वी बिग बॉस, मुव्‍‌र्हस अ‍ॅन्ड शेखर, ‘बॉडी शॉक, चू फुट हाय’ हॉलिवुड लघुचित्रपटात काम केले आहे. बाहेरच्या देशात जाते, त्यावेळी अनेक लोक माझ्याकडे कुतुहलाने बघतात. जगातील सर्वात उंच व्यक्तीला भेटल्याचे तिने सांगितले.