राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील त्या १,३७८ विद्यार्थ्यांना पदवी प्राप्त होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे संकेत मिळाले आहेत. व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. संजय खडक्कार यांच्या अध्यक्षतेखाली पुनर्गठीत केलेल्या समितीने त्या विद्यार्थ्यांच्या बनावट पदवीच्या संदर्भातील अहवाल कुलगुरू अनुपकुमार यांना अहवाल सादर केला आहे.
त्या विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाचे (इंटर्नल असेसमेंट) गुण मान्यताप्राप्त शिक्षकांनी द्यायचे, असा शिरस्ता मोडीत काढून विद्यापीठाने एक परिपत्रक काढून महाविद्यालय व्यवस्थापनाच्या अध्यक्ष आणि सचिवांना अंतर्गत मूल्यांकनाचे गुण पाठवण्याचे अधिकार बहाल केले. मात्र, एकही मान्यताप्राप्त शिक्षक नसलेल्या ११३ महाविद्यालयांनी त्यांच्या १,३७८ विद्यार्थ्यांचे पाठवलेले गुण नियमबाह्य़ असल्याने त्यांच्या पदव्या बनावट असल्याची तक्रार राष्ट्रपती आणि राज्यपालांकडे केली होती. त्यामुळे वादळ उठले होते. राष्ट्रपतींच्या नकारामुळे विद्यापीठाला पदवीप्रदान समारंभ रद्द करावा लागला. कुलगुरू डॉ. सपकाळ यांना पायउतार व्हावे लागले.
कुलपती कार्यालयातील सचिव विकास रस्तोगी आणि स्वत: अनुपकुमार यांच्या मते, त्या १,३७८ विद्यार्थ्यांच्या पदव्या बनावट नसल्याचे स्पष्ट झाले असले तरी कागदपत्रांच्या आधारे पुन्हा इत्थंभूत तपासणी व्हावी, अशी अपेक्षा होती. त्यासाठीच डॉ. खडक्कार यांच्या अध्यक्षतेखालील पहिल्या समितीने पदव्या बनावट नसल्याचा अहवाल देऊनही पुन्हा त्यांच्याच अध्यक्षतेखाली डॉ. खडक्कार यांची समिती कुलगुरूंनी पुनर्गठीत केली. समितीच्या अहवालात विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून निर्णय घेण्यात आला आहे. पदव्या बनावट नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. तरीही डॉ. खडक्कार यांच्या अध्यक्षतेखालील समितीचे पुनर्गठन करण्यात आले.
या समितीने नुकत्याच सादर केलेल्या अहवालात त्या विद्यार्थ्यांना क्लिन-चिट देत १०० व्या पदवीप्रदान समारंभाचा मार्ग मोकळा केला आहे. डॉ. नासरे, डॉ. के. सी. देशमुख आणि डॉ. प्रमोद येवले यांनी समितीत सदस्य म्हणून काम पाहिले.