विविध कला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असलेला काळाघोडा महोत्सव १ फेब्रुवारीपासून सुरू होत असून हा महोत्सव १० फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांची काही वर्षांपूर्वी ध्वनिचित्रमुद्रित केलेली मुलाखत या महोत्सवात दाखविण्यात येणार आहे. महोत्सवाचे यंदा १६ वे वर्ष असून महोत्सवात रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे.
चित्रकला, दृश्यकला, संगीत, नाटक, पथनाटय़, साहित्यविषयक कार्यशाळा आणि अन्य अनेक विषयांवर महोत्सवात ३५० कार्यक्रम होणार आहेत. फोर्ट विभागातील जहांगीर कला दालन परिसरात हा महोत्सव आयोजित करण्यात येतो. या महोत्सवाच्या निमित्ताने क्रॉस मैदान येथे संगीत आणि नृत्य मैफलीचे कार्यक्रम होणार आहेत. तर छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या हिरवळीवर लहान मुलांसाठी विविध विषयावरील कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. मुलांच्या साहित्यावरील ‘किताब खाना’, डेव्ह्डि ससून ग्रंथालय येथे साहित्यविषयक चर्चा आणि परिसंवाद, एशियाटिक सोसायटीच्या परिसरात होणारी संगीत मैफल आणि अन्य विविध कार्यक्रमांचा आस्वाद रसिकांना महोत्सवात घेता येणार आहे.
ज्येष्ठ समीक्षक पुष्पा भावे यांनी १९८५ मध्ये डॉ. श्रीराम लागू यांची प्रकट मुलाखत घेतली होती. डॉ. लागू यांच्या एका चाहत्याच्या संग्रहातील या मुलाखताची ध्वनिचित्रफित काळा घोडा महोत्सवात रविवार, २ फेब्रुवारी रोजी रात्री ८. ४५ वाजता डेव्हिड ससून ग्रंथालयाच्या उद्यानात दाखविण्यात येणार आहे.