धावणीत कौशल्य मिळविणाऱ्या कळंबोलीची पी.टी. उषा म्हणजेच ऐश्वर्या शेटे हिला थायलंड येथील मेरेथॉन स्पर्धेपर्यंत पोहोचण्यासाठी सामाजिक पाठबळ मिळाले आहे. ऐश्वर्या व तिची आई गेल्या अनेक दिवसांपासून मदतीच्या पाठिंब्यासाठी बडय़ा व्यक्तींची भेट घेत होती. मात्र कोणतीही मदत तिला मिळाली नाही. मात्र शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व परिसरातील व्यापाऱ्यांनी तिला मदतीचा हात दिल्याने तिची थायलंड स्पर्धा निश्चित झाली आहे.
ऐश्वर्या ही कळंबोली वसाहतीमधील कारमेल विद्यालयाशेजारी एव्हरेस्ट इमारतीमध्ये राहते. तिने धावण्याच्या अनेक मेरेथॉन स्पर्धेत यश कमावले आहे. कळंबोली येथे राहणारी ऐश्वर्या उरण येथील फोंडा महाविद्यालयात शास्त्र शाखेच्या दुसऱ्या वर्षांत शिकते. तिने आतापर्यंत मुंबई, उपनगर व राज्यात अनेक ठिकाणच्या स्पर्धामध्ये आपला अव्वल क्रमांक पटकावला आहे.
घरची परिस्थिती बेताची असल्याने तिला थायलंड येथे होणाऱ्या मेरेथॉनमध्ये जाणे शक्य होत नसल्याची बातमी शेकापचे नेते बाळाराम पाटील, गोपाळ भगत, दिलीप खानावकर तसेच वाहतूकदार संघटनेचे रामदास शेवाळे यांना समजताच त्यांनी तिच्या घरी जाऊन तिला मदतीचा हात पुढे केला.
त्यामुळे कालपर्यंत सर्व आशा मावळलेली ऐश्वर्या उद्या थायलंडसाठी रवाना होणार असल्याची माहिती तिचे प्रशिक्षक प्रशांत पाटील यांनी सांगितली.