डोंबिवली पूर्व भागातील मुख्य रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण करण्यासाठी खोदण्यात आल्याने शहरात अभूतपूर्व वाहतूक कोंडी होत आहे. वाहतुकीचे कोणतेही नियोजन न करता पालिकेतर्फे ही कामे करण्यात येत असल्याने नागरिकांना विशेषत: रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या वाहनांची सर्वाधिक पंचाईत होत आहे.
डोंबिवली शहरातून शीळफाटा दिशेने बाहेर पडण्यासाठी महत्त्वाचा असलेला मानपाडा रस्ता, कल्याणकडे जाण्यासाठी लागणारा टिळक रस्ता ते घरडा सर्कल रस्ते कल्याण-डोंबिवली पालिकेने सिमेंट- काँक्रिटच्या रस्त्यांच्या कामांसाठी पुन्हा खोदल्याने या रस्त्यांवर सकाळ, संध्याकाळ अभूतपूर्व वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीतून सुटका करून घेण्यासाठी बहुतांशी वाहनचालक गोग्रासवाडी, संत नामदेव पथ, पाथर्ली, टिळकनगर या रस्त्यावरून घुसत असल्याने वाहतूक कोंडीत आणखी भर पडत आहे. रेल्वे स्थानकालगतचा फडके रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे. या ठिकाणचे काम अहोरात्र सुरू असल्याने हे काम लवकर पूर्ण होण्याची शक्यता आहे. मानपाडा रस्ता, शेलार चौक रस्त्यावरील कामे संथगतीने सुरू असल्याने नागरिकांचा संताप होत आहे.
रस्ते खोदून ठेवल्यानंतर ही कामे अतिशय संथगतीने होतात. या कामाच्या कामगारांवर ठेकेदाराचा, ठेकेदारावर पालिका अभियंत्यांचा अंकुश नसल्याने त्याचे चटके नागरिकांना वाहतूक कोंडी, धुळीचे लोट या माध्यमातून बसत आहेत. या वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका करावी, म्हणून मनसे पदाधिकाऱ्यांचे एक शिष्टमंडळ डोंबिवली वाहतूक विभागाचे वरिष्ठ  पोलीस निरीक्षक बी. एम. कदम यांना भेटले. तेव्हा याबाबतीत पालिका आयुक्त सहकार्य करीत नसल्याचे कारण त्यांनी सांगितले. डोंबिवली शहराला ५० वाहतूक सेवकांची गरज आहे. प्रत्यक्षात नऊ सेवक काम करीत आहेत.
शेलार चौकात कोंडी
घरडा सर्कलजवळील शिवम रुग्णालय ते शेलार चौक दरम्यानचा एका बाजूचा रस्ता काँक्रिटच्या कामासाठी खोदून ठेवण्यात आला आहे. कल्याणमधून येणारी व तिकडे जाणारी वाहने याच रस्त्यावरून ये-जा करतात. त्यामुळे शेलार चौक ते शिवम रुग्णालयाच्या दुतर्फा वाहनांचा सकाळी आणि संध्याकाळी रांगा लागलेल्या असतात. या कोंडीतून सुटका करण्यासाठी शेलार चौक, जिमखाना भागात अडकलेली वाहने मधल्या रस्त्याने गोग्रासवाडी, संत नामदेव पथ, टिळकनगर भागातील रस्त्यावर घुसतात. याचा सर्वाधिक फटका शाळेच्या बसना बसतो. मानपाडा रस्ता गावदेवी मंदिर परिसरात खोदून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या भागात सतत वाहतूक कोंडी होते. अनेक वाहने दत्तनगर चौक, सुनीलनगर, समर्थमठ, गांधीनगर भागांतून शिळफाटा रस्त्याकडे निघतात. अटीतटीची परिस्थिती असताना स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण, महापौर कल्याणी पाटील, शिवसेनेचे सभापती दीपेश म्हात्रे या विषयावर गप्प का आहेत, असे प्रश्न नागरिकांकडून विचारले जात आहेत.
वाहतूक पोलिसांचे ‘लक्ष्मी चौक’
डोंबिवलीत अभूतपूर्व वाहतूक कोंडीची परिस्थिती आहे. वाहतूक विभागातील २४ कर्मचारी ही परिस्थिती हाताळत आहेत. अशा गंभीर परिस्थितीत डोंबिवली वाहतूक शाखेतील चार ते पाच पोलीस सकाळी आठ वाजता शहरात काय चालले आहे, यापेक्षा प्रीमिअर कंपनीसमोर, टाटा कंपनीसमोर, काटई नाका चौकात दुचाकी, अवजड वाहने अडवून त्यांच्याशी खलबते करून ‘लक्ष्मीभिषेक’ करून घेत असल्याचे चित्र नियमित दिसते. कल्याणमधील दुर्गाडीजवळील चौक, पत्रीपूल, टाटा नाका, पिसवली, प्रीमिअर कंपनी, काटई नाका हे वाहतूक पोलिसांचे ‘लक्ष्मी चौक’ म्हणून ओळखले जातात. वरिष्ठांपासून ते वाहतूक सेवकापर्यंत हे ठरावीक वाहतूक पोलीस चांगले ‘संबंध’ ठेवून असल्याने त्यांना लक्ष्मी चौकातील सेवेच्या नियमित डय़ुटय़ा मिळतात, अशी चर्चा आहे.