मध्य रेल्वे मार्गावरील सर्वाधिक गर्दीचे स्थानक म्हणून नेहमीच चर्चेत राहिलेल्या कल्याण रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाण्यासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने उभारलेल्या एकमेव स्कॉयवॉकची अवस्था अतिशय जर्जर बनली असून दुरवस्था झालेल्या या स्कॉयवॉकच्या देखभालीकडे कुणी ढुंकूनही पाहत नसल्याचे चित्र सातत्याने दिसू लागले आहे. कोटय़वधी रुपये खर्च करून पश्चिमेत उभारण्यात आलेल्या या स्कायवॉकची गेल्या वर्षभरात पुरेशी देखभालदुरुस्ती करण्यात आली नसल्याने स्थानकाच्या दिशेने ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या हालात मोठी भर पडत आहे. जागोजागी जागा अडवून बसलेल्या फेरीवाल्यांमुळे या ठिकाणी आधीच घाणीचे साम्राज्य वाढीस लागले असताना गेल्या महिनाभरापासून येथील लाद्याही निखळू लागल्या आहेत. लोखंडी फ्रेम्समधील लाद्या फुटून निखळल्या असल्याने यावरून चालणाऱ्या पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होऊ लागला आहे.
मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या पुढाकाराने कल्याणात प्रवाशांच्या सोयी-सुविधांसाठी या स्कॉयवॉकची उभारणी करण्यात आली आहे. या परिसरातील सुमारे दहा लाखांहून अधिक पादचारी या स्कायवॉकचा दैनंदिन वापर करतात. अशा उपयुक्त स्कायवॉकला प्रशासकीय यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे उपेक्षित वागणूक मिळू लागली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाकडे या स्कायवॉकच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र प्रवाशांच्या वारंवार तक्रारीनंतरही महापालिका या ठिकाणी लक्ष देण्यास तयार नाही. कल्याण, डोंबिवली परिसरात बेकायदा बांधकामे, फेरीवाल्यांनी अक्षरश: उच्छाद मांडला आहे. कल्याणचा हा स्कॉयवॉकही फेरीवाल्यांच्या ताब्यातून सुटलेला नाही. फेरीवाल्यांनी या स्कायवॉकचा ताबा घेतला असून भाजीपाल्यापासून चायनीज वस्तूंची विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांची संख्या या ठिकाणी दररोज वाढत आहे. स्कायवॉक केवळ नागरिकांना चालण्यासाठी बांधण्यात यावा यासाठी येथील व्यापारी वापराला सुरुवातीपासूनच विरोध झाला होता. फेरीवाल्यांच्या साम्राज्याने नागरिकांना जीव नकोसा केला आहे. महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आणि पोलीस प्रशासनाचा असहकार यामुळे या फेरीवाल्यांचा त्रास येथून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना सहन करावा लागत आहे. प्लास्टिकचा कचरा, कुजलेल्या भाज्यांची घाण हे फेरीवाले त्याच ठिकाणी टाकून देतात. त्यामुळे स्कायवॉकवर दरुगधी आणि घाणीचे साम्राज्य पसरले आहे. पुरेशा देखभाल-दुरुस्तीच्या अभावी स्कायवॉकची दुरवस्था होण्यास सुरुवात झाली आहे. स्कायवॉकच्या लाद्या फुटल्या असून, जागोजागी पावसाचे पाणी साचू लागले आहे. पुलाचे लोखंडी बांधकामसुद्धा गंजू लागले असून अनेक ठिकाणचे स्टीलच्या कामसुद्धा तुटण्यास सुरुवात झाली आहे.
या स्कायवॉकच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षकांची नियुक्ती केली असली तरी फेरीवाल्यांपुढे त्यांचेही काही चालत नाही, असे चित्र आहे. पोलीस प्रशासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्षच केले असल्याने या भागात भिकारी, गर्दुल्ल्यांचा वावरसुद्धा वाढला आहे, ज्याचा त्रास नागरिक सहन करत आहे. स्वच्छतेसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांकडूनसुद्धा व्यवस्थित स्वच्छता होत नसल्याने स्कायवॉकची पुरती दुर्दशा अवघ्या तीन ते चार वर्षांत झाली आहे.
स्कायवॉकवरची सध्याची दुरवस्था पाहिल्यानंतर स्कायवॉक नेमका कुणासाठी, असा प्रश्न पडला आहे. फेरीवाल्यांचे साम्राज्य असून त्यांना तेथून हटवण्यात प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे अपयशी आहेत; तर तुटलेले लोखंड, फुटलेल्या लाद्या यामुळे पादचाऱ्यांच्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. पालिका प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज असून येथील अनधिकृत गोष्टींवर त्वरित कारवाई करण्याची गरज असल्याचे मत कल्याणमधील योगेश मोकाशी यांनी व्यक्त केले आहे.