दररोज एक हजार ते बाराशे रूग्णांना रूग्ण सेवा देणाऱ्या पालिकेच्या कल्याणमधील रूक्मिणीबाई आणि डोंबिवलीतील शास्त्रीनगर रूग्णालयांमध्ये पुरेसे डॉक्टर आणि परिचारिका नाहीत. उपलब्ध वैद्यकीय यंत्रणाही बंद असल्याने रूग्णांना उपचारासाठी नाईलाजाने महागडय़ा खाजगी इस्पितळातून इलाज करवून घ्यावा लागतो. पावसामुळे रूग्णालयाच्या अनेक रूग्ण खोल्यांमध्ये पाऊस धारा सुरू असल्याने रूग्णालय की जनावरांचा गोठा अशी अवस्था पालिका रूग्णालयांची झाली आहे.
दोन्ही रूग्णालयांमध्ये ३२ डॉक्टरांची पदे मंजूर आहेत. त्यापैकी ११ पदे रिक्त आहेत. परिचारिकांच्या ७५ पदांपैकी १० पदे रिक्त आहेत. वैद्यकीय विभागाचे प्रमुख पद गेल्या तीन वर्षांपासून प्रभारी आहे. मुख्य वैद्यकीय अधिकारी पदे कार्यक्षम नसलेल्या अधिकाऱ्यांकडे प्रभारी म्हणून सोपवण्यात आली आहेत. राजकीय आशीर्वादाने ही पदे वाटप करण्यात आल्याने रूग्ण सेवेवर त्याचा परिणाम होत आहे. रूग्णालयाचे दोन उचपदस्थ अधिकारी ‘आमची पदे काढून घ्या’ अशी गळ प्रशासनाला घालत आहेत. त्याकडे प्रशासनाकडून सोयीस्कर कानाडोळा करण्यात येत आहे. पालिकेचा आस्थापना खर्च ४० टक्क्यांच्या वर गेल्याने शासन रूग्णालयाला अत्यावश्यक असलेली रूग्ण सेवेची ९० पदे भरण्यास तयार नाही. ही पदे भरण्याच्या मागणीसाठी आपण शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे, असे उपमहापौर राहूल दामले यांनी सांगितले.
शास्त्रीनगर रूग्णालय ठप्प
शास्त्रीनगर रूग्णालयातील सोनोग्राफी यंत्र बंद आहे. बालरोग तज्ज्ञ नसल्याने बाल रूग्ण सेवा देणारी यंत्रणा व बाळांचा स्वतंत्र विभाग बंद आहे. प्रसुतीनंतर महिलांची देखभाल घेणारा विभागही ठप्प आहे. अपघात विभागासाठी डॉक्टर नाही. एम. बी. बी. एस. डॉक्टर नाहीत. लॅब साहाय्यक नाही. आयसीयु यंत्रणा बंद आहे. भाजलेल्या रूग्णांचा विभाग बंद आहे. कृत्रिम श्वसन यंत्रणा बंद आहे. डॉक्टर, संबंधित कर्मचारी नसल्याने हे सर्व विभाग बंद आहेत, असे शास्त्रीनगर रूग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. रेखा सारस्वत यांनी सांगितले. आमदार रवींद्र चव्हाण यांच्या आमदार निधीतून गेले तीन वर्ष शास्त्रीनगर रूग्णालयात डायलिसीस सेंटरचे काम सुरू आहे. हे काम संथगतीने सुरू आहे असे रूग्णालयातील परिचारिकांनी सांगितले. शास्त्रीनगर रूग्णालयातील वसतिगृहाची जागा शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी उद्यानासाठी वापरल्याने डॉक्टरांना निवासाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे डॉक्टर रूग्णालयात टिकत नाहीत, असे विश्वनाथ राणे यांनी सांगितले. रूग्णालयाच्या गच्चीवर प्रचंड भंगार साचले आहे. त्याची दखल मुख्यालयातून घेण्यात येत नसल्याने ते कुजत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
रूक्मिणीबाई रूग्णालय गॅसवर
कल्याणमधील रूक्मिणीबाई रूग्णालयात तीन डॉक्टर, परिचारिका कमी पडतात. प्रस्ताव देऊन त्याची दखल घेतली जात नाही. रेडिऑलॉजीस्ट नसल्याने सोनोग्राफी, एक्सरे मशीन बंद आहेत. वॉडबॉयकडून एक्सरेची कामे दोन्ही रूग्णालयात करून घेतली जातात. दीड वर्षांपासून हे पद रिक्त आहे. पाच वर्षांपासून डॉक्टरची पदे रिक्त आहेत. अपघात विभागात हाड तज्ज्ञ नसल्याने अन्य डॉक्टर रूग्ण तपासणी करतात. कृत्रिम श्वसन यंत्रणा चालवण्यासाठी तंत्रज्ञ नाही, असे मुख्य अधिकारी डॉ. अशोक भिडे यांनी सागितले. रूग्णालयात काही ठिकाणी पावसाच्या धारा लागतात. महिला विभागाला दरवाजे नाहीत.
पालिका रूग्णालयातील डॉक्टर आपल्या खासगी दवाखान्यांमध्ये रूग्णांना पाठवून पैसे उकळतात, अशी टीका नगरसेवक सचिन पोटे यांनी केली. डॉ. वरूण दराडे या पालिकेच्या डॉक्टरने पालिका रूग्णालयात प्रसुतीसाठी आलेल्या महिलेला आपल्या खासगी रूग्णालयात पाठवून तिच्याकडून २१ हजार रूपयांचे देयक वसूल केले असल्याचे पोटे यांनी सभागृहात कागदपत्रांच्या पुराव्यासह सांगितले. बेडर झालेल्या प्रशासनाने नेहमीच्या ठोकळेबाज पध्दतीने रिक्त पदे लवकर भरली जातील. रूग्णालय इमारतींची डागडुजी केली जाईल, असे सांगितले.