पु. ल. देशपांडे कला अकादमी आणि पंचम निषाद यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या १२ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत ‘कंठ स्वर उत्सव’ या संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
 या महोत्सवात भारतीय शास्त्रीय संगीतातील सहा तरुण गायक आपली कला सादर करणार आहेत. भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील तरुण गायकांना आपले गायन सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळावे, या मुख्य उद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात येतो.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सुचिस्मिता दास आणि प्रसाद खापर्डे यांचे शास्त्रीय गायन सादर होणार आहे. हे दोघेही अनुक्रमे अजय चक्रवर्ती व उस्ताद राशिद खान यांचे शिष्य आहेत. दुसऱ्या दिवशी रमाकांत गायकवाड आणि शाश्वती मंडल यांचे तर महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी सायली तळवलकर यांचे गायन सादर होणार आहे. महोत्सवाची सांगता संजीव चिमलगी यांच्या गायनाने होणार आहे.
तीनही दिवसाचे कार्यक्रम दररोज सायंकाळी साडेसहा वाजता प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या तिसऱ्या मजल्यावरील मिनी थिएटर येथे होणार आहेत. या महोत्सवासाठी सर्व रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे.
अधिक माहिती आणि प्रवेशिकांसाठी रवींद्र नाटय़ मंदिर (०२२-२४३१२९५६) िंकवा पंचम निषाद (०२२-२४१२४७५०) येथे संपर्क साधावा, असे आवाहन अकादमीतर्फे करण्यात आले आहे.