उरण तालुक्याला रायगड जिल्ह्य़ाची राजधानी असलेल्या अलिबागला जोडणाऱ्या करंजा ते रेवस या दोन बंदरांच्या दरम्यान जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जलप्रवासाची सोय आहे. केवळ १५ मिनिटांत हा प्रवास होत असून, या प्रवासासाठी पूर्वी साडेसात रुपये भाडे आकारले जात होते. यामध्ये वाढ करून ते साडेबारा रुपये करण्यात आले आहे. या दरवाढीमुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांवर पाच रुपयांचा अधिक भार पडणार आहे. उरण तालुक्यातून मुंबई भाऊचा धक्का ते मोरा तसेच करंजा ते रेवस या दोन जलसेवा आहेत. जलप्रवास हा सर्वात स्वस्त असल्याने या मार्गाने अलिबाग तसेच उरणहून मुंबईला तसेच मुंबईहून उरण व अलिबागला ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. मुंबई ते अलिबाग तसेच उरण ते अलिबाग हे अंतर रस्त्यामार्गे अधिक असल्याने दीड ते दोन तासांपेक्षा अधिक कालावधी या प्रवासासाठी लागतो, त्याच प्रमाणे वाहतूक कोंडीचा व प्रदूषणाचाही त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो. त्यामुळे जलद व कमी खर्चाचा तसेच प्रदूषणमुक्त प्रवास म्हणून जलमार्गाला येथील प्रवासी प्राधान्य देतात.
नुकताच महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने मोरा ते मुंबई तसेच मुंबई ते रेवस या दोन्ही जलमार्गाच्या प्रवासी भाडय़ात वाढ केली आहे. यामध्ये मोरा ते मुंबईदरम्यानच्या पाऊण तासाच्या प्रवासासाठी ३५ वरून ४५ रुपये, तर दीड तासांच्या मुंबई ते रेवसदरम्यानच्या प्रवासासाठी ५० वरून ६५ रुपये आणि करंजा ते रेवस या केवळ १५ मिनिटांच्या प्रवासासाठी पूर्वी साडेसात रुपये भाडे आकारले जात होते, त्यामध्ये वाढ करून साडेबारा रुपये करण्यात आले आहे.
या दोन्ही बंदरांत प्रवाशांना महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाकडून सुविधा पुरविण्याची जबाबदारी असताना त्या न पुरविताच ही दरवाढ करण्यात आलेली आहे. त्याच प्रमाणे या दोन्ही जलप्रवासासाठी वापरण्यात येणाऱ्या प्रवासी बोटी या जुन्या व धोकादायक असून, अनेकदा अपघाताच्या घटनाही घडलेल्या आहेत. याची मात्र दखल घेण्यात न आल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.