कोकणात अलीकडे पहाटे पडणारी थंडी, फळावर आलेली किटाणूंची संक्रांत, दुसऱ्या हंगामाच्या फळधारणेत झालेली कसूर, ढासळलेली गुणवत्ता, छोटा आकार अशा अनेक कारणांमुळे कोकणातील हापूस आंब्याला कमी भाव मिळत असून कर्नाटकमधून येणारा हापूस कोकणातील हापूस आंब्यावर वरचढ होत असल्याचे चित्र आहे. त्यात कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सुरू झालेल्या राडय़ांमुळे आंबे उतरवायला मजूर मिळनासे झाले असून त्याचा परिणाम आवकवर झाला आहे. त्यामुळे अगोदरच आर्थिक खाईत असलेला हापूस आंबा बागायतदार या वर्षी अधिक अडचणीत येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
फेब्रुवारी महिन्यात अध्र्या राज्यात झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे परिणाम कोकणातील हापूस आंबा बागायतदारांना आता जाणवू लागले आहेत. निसर्गाच्या या लहरीपणामुळे कडाक्याचे ऊन पडण्याच्या दिवसांत कोकणात सध्या पहाटे हलकशी थंडी पडत आहे, त्यामुळे हापूस आंबा पिकण्यासाठी लागणाऱ्या उष्ण हवामानाच्या विपरीत वातावरण असल्याने दुसऱ्या हंगामातील फळधारणेचा हापूस आंबा बाजारात कमी प्रमाणात येत आहे. पहिल्या हंगामातील हापूस आता संपण्याच्या बेतात असून दुसऱ्या हंगामातील हापूसची आवक मंदावल्याने केवळ ५० हजार पेटय़ा सध्या एपीएमसीच्या घाऊक बाजारात येत असल्याची नोंद आहे. त्यात अवकाळी पावसामुळे या वर्षी हापूस आंब्याची गुणवत्ता काहीशी ढासळली असून आकार लहान झाला आहे.
युरोपीयन राष्ट्रांनी हापूस आंब्यात किटाणू (फ्रुट फ्लाय) असल्याचा प्रचार केल्याने चोखंदळ हापूस खवय्यांनीदेखील नाके मुरडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या वर्षी उत्पादन चांगले येऊनही निसर्गाने हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याची प्रतिक्रिया आंबा बागायतदारांची आहे. त्यामुळे हापूसचा दर ३०० ते ६०० रुपये प्रतिडझनपर्यंत खाली आलेला आहे. याउलट कर्नाटकमधील हापूसने धुडगूस घातला असून सध्या दररोज ५० ट्रक भरून हापूस आंबा बाजारात येत असून स्वस्त आणि मस्त असलेल्या या हापूस आंब्याला मोठी मागणी आहे. ५० ते १२० रुपये प्रतिकिलो असलेला हा आंबा कोकणातील हापूस आंब्याला टक्कर देत असल्याचे आंबा व्यापारी विजय बेंडे यांनी सांगितले. यात काही चलाख आंबा विक्रेते कर्नाटकचा हापूस कोकणचा हापूस म्हणून विकत असल्याची बाबही उघडकीस आली आहे.