मी या तीरावरती
हवा मज तो किनारा
पावलांना आस वेडी ती पाण्याची
प्रवाहाची भीती काळजाला
यांसारख्या मार्मिक ओळींद्वारे हर्षांली घुले या अभियांत्रिकीच्या कवयित्रीने रसिकांना अंतर्मूख करून विचार करावयास भाग पाडले. येथील शासकीय कर्मचाऱ्यांच्या सार्वजनिक वाचनालयातर्फे आयोजित ‘काव्यपालवी’ या नवोदित कविंच्या काव्यवाचन मैफलीत हर्षांलीसह इतर अनेक नवोदित कविंनी आपल्या भावभावना उघड केल्या.
मग म्हटलो पुन्हा की मी
यावे कुणीतरी
कुणीच नाही आले पण
घंटा वाजली शेजारी
वैयक्तिक छोटय़ा-मोठय़ा दु:खावर उपहासाचा आसूड ओढत त्यांच्यावरच स्वार होणाऱ्या आदिल शेख या नाटय़ कलावंताने रसिकांवर छाप पाडली.
मी जाळली तुझी ती सारीच प्रेमपत्रे
पण नाव अंतरीचे प्रिये तुझे जळेना
तु सांग जीवना मी वागू कसा कळेना
याद तिची टाळूनही टळेना
अल्पावधीतच गझलचे तंत्र आत्मसात करून आकाश कंकाळ या कविने एकाहून एक शेर सादर करत टाळ्या घेतल्या. वाचनालयाचे सचिव हेमंत पोतदार अमेरिका दौऱ्यावर जाणार असल्याच्या निमित्ताने प्रास्तविकात सहसचिव विवेक उगमुगले यांनी त्यांना अमेरिकेतील वेगवेगळ्या घटना, व्यक्ती व प्रसंग यांचे विविधांगी विस्तृत विवेचन करणारा ग्रंथ निर्माण लिहावा यासाठी पेन व डायरी भेट दिली. वाचनालयाचे कोषाध्यक्ष प्रमोद जावळे, कवी व वात्रटिकाकार नरेश महाजन, हेमंत पोतदार यांच्या हस्ते नवकविंचा सत्कार करण्यात आला.
सामाजिक परिस्थिती, राजकारण, आरक्षण वगैरे बाबींचा अत्यंत डोळसपणे विचार करून देशातील तरुणाई म्हणजेच आजचे नवोदित कवी हे केवळ छानछौकीत दंग नसून प्रखर वास्तवभान ठेवणारी व प्रगल्भ असल्याचे समाधान वाटत असल्याचे वाचनालयाचे संस्थापक ल. गो. जोशी यांनी सांगितले. केवळ वैयक्तिक रडगाणे न लिहिता सामाजिक कविता लिहिण्याचेही त्यांनी आवाहन केले. कवी रवींद्र मालुंजकर यांनी आभार मानताना हर्षांलीच्या शाब्दीक चपराक देणाऱ्या प्रतिभेचे तसेच आदिल शेख, आकाश कंकाळ यांचेही कौतुक केले. पोतदार यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. जयश्री वाघ आणि अभिजीत शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.