कल्याण डोंबिवली शहरातील विकास कामांचा पूर्णत: बोजवारा उडाला आहे. त्याविषयी चिंतन करण्याऐवजी महापालिकेतील ४० नगरसेवक दोन दिवसांपूर्वी केरळच्या दौऱ्यावर तेथील महापालिकांमधील कारभाराची पाहणी करण्यासाठी गेले आहेत. दौऱ्यावर गेलेल्या नगरसेवकांची सोशल मीडियावर झळकणारी छायाचित्रांमध्ये हत्तींवर बसून सुरू असलेली सफाई अधिक चर्चेचा विषय ठरू लागली आहे. 

केरळमधील महापालिकांचा कारभार, तेथील पर्यटनाच्या संधी अशाविषयीचा अभ्यास करण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेतील ४० नगसेवक दौऱ्यावर गेले आहेत. अभ्यास दौऱ्यासाठी गेलेल्या या नगरसेवकांच्या राहण्यासाठी तारांकित हॉटेलची सोय करण्यात आली आहे. मागील साडेचार वर्षांत महापालिकेतील नगरसेवकांनी देशाच्या विविध प्रांतात अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली आठ ते नऊ दौरे केले आहेत. त्यासाठी १५ ते २० लाखांचा चुराडा केला आहे. असे असताना केरळच्या दौऱ्यात नगरसेवक कोणता अभ्यास करतात याकडे सर्वाचे लक्ष लागले असताना या नगरसेवकांची हत्तीवर बसून सैर करत असल्याची छायाचित्रे सोशल मीडीयावरून प्रसिद्ध होऊ लागल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. महापालिकेच्या सभागृहात कधीही चकार शब्द न बोलणारे नगरसेवक दौऱ्यात मात्र उंची ऐट करताना दिसत असल्याची छायाचित्र सोशल मीडियावर झळकू लागली आहेत. कल्याण डोंबिवलीतील नागरिकांनी या छायाचित्रांचे दर्शन घेऊन आपल्या नगरसेवकांचे प्रताप जतन करून ठेवावेत. येत्या बारा महिन्यांनी पालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यावेळी नगरसेवकांकडून ३५ लाख रुपयांचा हिशेब चुकता करता येईल, अशी चर्चा जोर धरू लागली आहे.