शिवसेनेचे पोलीस आयुक्तांना निवेदन
शहरातील पानदरिबा येथील एका हॉटेलमध्ये लोटाकारंजा व नबाबपुरा येथील गुंडांनी तलवारी, कोयते व हॉकी स्टीक घेऊन निष्कारण धुडगूस घातला, शिवीगाळ केली, तसेच वाहनांच्या काचा फोडल्या. हे चुकीचे असून शहरातील काही भागांत पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या जात आहेत. या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी विशेष काळजी घ्यावी व शहरवासीयांमध्ये निर्माण झालेले भीतीचे वातावरण दूर करावे, अशी मागणी खासदार चंद्रकांत खैरे यांनी निवेदनाद्वारे पोलीस आयुक्तांना दिली.
एमआयएमच्या ओवेसीने केलेल्या वक्तव्यामुळे वातावरण गढूळ बनले आहे. त्याचा कायदा व सुव्यवस्थेवर परिणाम होत असल्याचे पत्रकात म्हटले आहे. शहरात गेल्या २३ वर्षांपासून दंगल झालेली नाही. पण ओवेसीच्या वक्तव्यामुळे तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. शहरात वेगवेगळय़ा घटनांमुळे भय वाढले आहे.
चोऱ्या, घरफोडय़ा, मंगळसूत्र पळविण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. असुरक्षिततेची भावना बळावली असल्याने पोलिसांच्या कार्याबाबत भ्रमनिरास झाला असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, आमदार प्रदीप जैस्वाल व किशनचंद तनवाणी, महापौर कला ओझा यांच्या सहय़ा आहेत.