उरण तालुका पूर्व व पश्चिम भाग खाडीपुलामुळे विभागला गेला आहे. या दोन भागांना जोडणारा खोपटा पूल उभारण्यात आला आहे. परंतु या पुलावरून जड वाहने नियमबाह्य़ वाहतूक करीत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. बुधवारी अशाच एका अपघातात दुचाकीवरील दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे खोपटा पूल हा मृत्यूचा सापळा बनला आहे.
खोपटा पूल उभारल्याने उरण पूर्व विभागाचा विकास झाला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने जुन्या पुलाला पर्याय म्हणून दोन वर्षांपूर्वी या नव्या पुलाची उभारणी केली आहे. त्यामुळे या दोन्ही पुलांचा येण्या व जाण्यासाठी उपयोग केला जात आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याकडून फलक लावण्यात आले असतानाही शेजारीच असलेल्या गोदामात ये-जा करणारी जड वाहने जवळचा मार्ग म्हणून जुन्याच पुलावरून विरुद्ध दिशेने वाहने चालवीत आहेत. नादुरुस्त असलेल्या पुलामुळे यापूर्वी अनेक अपघात होऊन येथील नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. बुधवारी झालेल्या अपघातात महेश कांबळे व राणा सिंग यांना जड वाहनाने धडक दिल्याने त्यात ते गंभीर जखमी झाले. अशा अपघाताची पुनरावृत्ती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या संदर्भात या परिसरातील जिल्हा परिषद सदस्य विनोद म्हात्रे यांनी दोन्ही पुलांच्या दरम्यान अडथळे उभारून विरुद्ध दिशेने होणारी वाहतूक बंद करावी, अशी मागणी केली आहे. गुरुवारी उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र गलांडे व सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता ए.राजन हे पाहणी करणार आहेत.