ऐरोली येथील आठ वर्षीय मुलीचे घराजवळून अपहरण होऊन ४८ तासांपेक्षा जास्त कालावधी झाला तरी नवी मुंबई पोलीस तपास सुरू असल्याचे तुणतुणे वाजवत बसले आहेत. सेक्टर आठमधील एकविरा दर्शन या सोसायटीतील काही पदाधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे या सोसायटीत सीसीटीव्ही कॅमेरे लागू शकले नाहीत. त्यामुळे या मुलीचे अपहरण करणाऱ्यांचा काहीही थांगपत्ता लागत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
ऐरोली सेक्टर आठमधील एकविरा दर्शन सोसायटीत राहणारी फॅन्चेला फ्रॉन्सिको ही आठ वर्षीय मुलगी सोमवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घराजवळून बेपत्ता झाली आहे. तेव्हापासून पोलीस या मुलीचा शोध घेत आहेत. या मुलीची आई असाध्य आजाराने अंथरुणाला खिळलेली आहे तर वडील  नोकरीच्या निमित्ताने परदेशात गेलेले आहेत. मुलीच्या अपहरणाची बातमी कळल्यानंतर ते परतले आहेत. नेहमी सेक्टर १९ मधील न्यू हॉराईझोन शाळेतून संध्याकाली सव्वासहा वाजता घरी परतणारी फॅन्चेला रात्री उशिरापर्यंत न परतल्याने फॅन्चेलाच्या नातेवाईकांनी तक्रार केली. पोलिसांनी या मुलीच्या तपासासाठी अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली तीन तपास पथके स्थापन केली आहेत.
फॅन्चेलाला लाल रंगाच्या स्विफ्ट कारमधून नेण्यात आल्याचे रस्त्यावरील एका मुलाने सांगितले आहे. परिचय असल्याशिवाय फॅन्चेला लगेच गाडीत बसणार नाही, असा पोलिसांचे मत आहे. त्यामुळे अपहरण करणारा परिचित असावा असे पोलीस सांगत आहेत. अपहरण पैशासाठी झाले असते तर आतापर्यंत पैशाची मागणी करणारा फोन आला असता तोही आलेला नसल्याने पोलीस संभ्रमात पडले आहेत. या मुलीच्या अपहरणामुळे नवी मुंबईत खळबळ माजली आहे.
सीसीटीव्ही असते तर..
पालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत शहरी भागातील अनेक उमेदवारांनी एकगठ्ठा मतांसाठी इमारतीत सीसीटीव्हीचे वाटप केले होते. एकविरा सोसायटीचा प्रभाग क्रमांक २२मध्ये समावेश आहे. त्यामुळे या प्रभागातील अपक्ष उमेदवार राजेश मढवी यांनी या सोसायटीतील एकगठ्ठा मतांसाठी एक लाख ६० हजार रुपये या सोसायटीतील काही पदाधिकाऱ्यांना दिल्याचे मढवी यांनी सांगितले मात्र सोसायटीतील पदाधिकाऱ्यांनी हे सीसीटीव्ही बसविले नाहीत. यावरून पहिल्याच दिवशी मढवी व पदाधिकाऱ्यांची सोसायटी आवारात तू तू मै मै झाली. सीसीटीव्ही नसल्याने सोसायटीच्या गेटवर अपहरण झालेल्या फॅन्चेलाचे चित्रीकरण सीसीटीव्हीत बंद होऊ शकले नाहीत. हे चित्रीकरण आज पोलिसांच्या तपासकामी आले असते अशी चर्चा आहे.