शारीरिक व मानसिकदृष्टय़ा अपंगत्व असलेल्या विशेष मुलांना विज्ञानाचा आनंद मिळावा या उद्देशाने जिज्ञासा ट्रस्ट व वर्तकनगर शिक्षण मंडळ यांच्या वतीने ‘ज्ञान-विज्ञान महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे.
ठाण्याचे महापौर संजय मोरे यांच्या हस्ते शुक्रवारी या महोत्सवाचे उद्घाटन होणार असून हा महोत्सव १ फेब्रुवारीपर्यंत श्रीमती सावित्रीदेवी थिराणी विद्यामंदिर येथे सुरू राहणार आहे. ठाणे महापालिकेतील विद्यार्थी, शारीरिक व मानसिक अपंगत्व असलेली आणि वीटभट्टीवरील फिरत्या शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी या महोत्सवामध्ये सहभागी होणार आहेत. शहरातील ४०० हून अधिक विशेष मुले तर शहरातील सर्वसाधारण शाळांमधील विद्यार्थीही या महोत्सवात सहभागी होऊ शकतात, अशी माहिती जिज्ञासा ट्रस्टचे सुरेंद्र दिघे यांनी दिली. शास्त्रोक्त प्रयोगशाळा, तज्ज्ञ मार्गदर्शक यांच्याशिवाय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची रुची निर्माण व्हावी आणि त्यांना विज्ञानातील आनंद घेता यावा या उद्देशाने पाच वर्षांपासून जिज्ञासा ट्रस्टच्या वतीने ज्ञान-विज्ञान महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.
वंचित आणि दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांपर्यंत विज्ञानाचे ज्ञान पोहोचावे या उद्देशाने हा महोत्सव सुरू करण्यात आला. यंदा ठाणे महापालिकेने या महोत्सवाला सहकार्य केले आहे.
महोत्सवात विद्यार्थी व शिक्षक कार्यशाळा होणार असून नंदूरबार येथील बी. एड. महाविद्यालयााचे निवृत्त प्राचार्य म. ल. नानकर, फलटण येथील माजी मुख्याध्यापक व गणितज्ञ रवींद्र येवले, प्रसिद्ध विज्ञान संवादक हेमंत लागवणकर हे मार्गदर्शन करणार आहेत.
पिंपरी-चिंचवड विज्ञान केंद्रातील तज्ज्ञ व्यक्ती मुलांना ‘कल्पकतेतून विज्ञान’ ही संकल्पना समजावून सांगणार आहेत. जिज्ञासा ट्रस्टचे विज्ञान केंद्र व गणिताची प्रयोगशाळा, हसत खेळत गणित व विज्ञान समजावून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना उपलब्ध असणार आहे.