लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीला अनुकूल वातावरण असल्याने मीडियाचे दावे फोल ठरतील, असा दावा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला. कोल्हापूरच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही आहे. तर, हातकणंगलेच्या जागेचा निर्णय हायकमांडकडून होईल असे ते म्हणाले.
लोकसभा निवडणुकांचे वातावरण तापू लागले आहे. सध्याचे राजकीय वातावरण काँग्रेस आघाडीला अनुकूल आहे. राजीव गांधी जीवनदायी योजना, महिला, अपंग, दलित-आदिवासी यांच्या सबलीकरणासाठी काँग्रेस आघाडी सरकारने अनेक महत्त्वाकांक्षी योजना राबविल्या असल्याने त्याचा निश्चितच चांगला फायदा होईल. काँग्रेसला त्यागाची आणि विचारांची परंपरा असल्याने काँग्रेसच्या राष्ट्रीय विचारालाच लोकांची साथ मिळेल. मीडियामधून कथित सव्‍‌र्हेच्या आधारे महायुतीच्या बाजूने कौल असल्याचे जे सांगितले जात आहे, त्यामध्ये तथ्य नाही. मीडियाचा हा पाहणी निकाल सन २००४ प्रमाणेच फोल ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कोल्हापूर  लोकसभेच्या जागेवर गतखेपेला सदाशिवराव मंडलिक यांनी अपक्ष म्हणून विजय मिळवला. तेथे राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. त्यानंतर मंडलिक हे काँग्रेसचेच सहयोगी सदस्य झाले असल्याने या जागेसाठी आम्ही आग्रही आहोत. मात्र, हातकणंगलेच्या जागेबाबत निश्चित काहीही सांगता येणार नाही. या जागेबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील, असे त्यांनी सांगितले.