हिरव्या हिरव्या रंगाच्या घनदाट झाडीतून, डोंगरांच्या कुशीतून, पाताळात झेपावणाऱ्या दऱ्याखोऱ्यांवरून अगदी डौलदारपणे जाणाऱ्या कोकण रेल्वेच्या दिमाखात वेगळीच भर पडली आहे. आतापर्यंत केवळ चहा, कॉफी, वडा, समोसा एवढय़ावरच मर्यादित असलेले कोकण रेल्वेच्या स्थानकांवरील स्टॉल्स आता कोकणातल्या मेव्याने ‘समृद्ध’ होणार आहेत. कोकणातली उत्पादने म्हणून ओळखली जाणारी आंबापोळी, फणसपोळी, गरे, काजूगर, कोकम सरबत असे पदार्थ आता कोकण रेल्वेच्या स्थानकांवरही रास्त दरांत उपलब्ध करून देण्याचा निर्णय कोकण रेल्वे महामंडळाने घेतला आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या सूचनेनंतर महामंडळाने त्वरीत हा निर्णय घेतला.
कोकण रेल्वेमार्गावरचा प्रवास कोणत्याही ऋतूत आणि खासकरून पावसाळ्यात डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो. मात्र निसर्गाच्या विविध रूपांचा आनंद देत डोळ्यांचे पारणे फेडणारा हा प्रवास जिभेचे चोचले पुरवण्याच्या बाबतीत मात्र भलताच कंजुष असल्याच्या प्रतिक्रिया अनेक प्रवाशांनी नोंदवल्या होत्या. गाडीत आणि रेल्वे स्थानकांवरही वडापाव, समोसापाव, इडली, मेदूवडा (उच्चारी मेंदुवडा), कटलेट, सँडविचेस याच पदार्थाची विक्री होत होती. त्यामुळे प्रवासादरम्यान झाडांवर दिसणारे आंबे-फणस प्रवाशांना वाकुल्या दाखवत होते. कोकण रेल्वेमार्गावर गाडय़ांमध्ये आणि स्थानकांवरही स्थानिक पदार्थ मिळावेत, स्थानिक उत्पादने मिळावीत, अशी मागणी प्रवाशांकडूनही वारंवार झाली होती. मात्र कोकण रेल्वे प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही.
गेल्या आठवडय़ात मुंबई आणि कोकण दौऱ्यावर आलेल्या रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी कोकण रेल्वेच्या अध्यक्षांना या मार्गावर स्थानिक उत्पादने विकण्याची सूचना केली. थेट रेल्वेमंत्र्यांनी केलेली ही सूचना कोकण रेल्वेने उचलून धरत तातडीने स्थानकांवर कोकणातील मेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उन्हाळ्यात प्रवासादरम्यान उन्हाच्या काहिलीने त्रस्त झाल्यावर, एखाद्या स्थानकात गाडी सिग्नलची वाट बघत खूप वेळ रेंगाळल्यावर प्रवाशांना थंडगार कोकम सरबताचा आस्वाद घेणे सहज शक्य होणार आहे.
कोकम सरबताचे विशेष स्टॉल्स उभारण्याच्या निर्णयाबरोबर स्थानकांवरील स्टॉल्सवर फणसपोळी, आंबापोळी, फणसाचे खारे गरे, रातांबी (कोकम), काजूगर आदी पदार्थही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच कोकण रेल्वेच्या महत्त्वाच्या स्थानकांवर फक्त मराठमोळ्या आणि त्यातही कोकणात बनवल्या जाणाऱ्या पदार्थाचे एक उपहारगृह असावे, अशी सूचनाही रेल्वेमंत्री प्रभू यांनी केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये कोकण रेल्वेवरील स्थानकांवर दडपेपोहे, ओल्या फेण्या, चिकोडय़ा, ओल्या नारळाच्या करंज्या असे खास कोकणात बनणारे पदार्थ मिळण्याची शक्यता आहे. आता कोकण रेल्वेवरील विविध समस्यांमुळे प्रवाशांचा प्रवास वक्तशीर होईल की नाही, माहीत नाही. पण त्यांना अस्सल कोकणी पदार्थाची मेजवानी नक्कीच मिळेल.