गेल्या वर्षी गणपतीच्या काळात कोकणात दिमाखात चाललेली वातानुकूलित डबलडेकर गाडी गेल्या काही महिन्यांपासून गायब आहे. मात्र आता ही गाडी मध्य रेल्वेऐवजी कोकण रेल्वे चालवणार असल्याची माहिती मिळत आहे. मध्य रेल्वेकडे या गाडीच्या देखभाल-दुरुस्तीसाठी जागाच नसल्याने ही गाडी कोकण रेल्वेकडे सोपवण्याची वेळ आल्याचे मध्य रेल्वेतील काही अधिकारी खासगीत सांगत आहेत. दादर आणि मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे वक्राकार पीटलाइनमुळे ही गाडी येथे येऊ शकत नाही. तर लोकमान्य टिळक टर्मिनसला गाडय़ांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी असलेल्या पीटलाइनवर इतर गाडय़ांचा ताण असल्याने कोकणासाठीच्या डबलडेकरसाठी येथे जागा नाही.
डबलडेकर गाडय़ांच्या डब्यांची रचना इतर डब्यांपेक्षा वेगळी आहे. त्यामुळे हे डबे इतर डब्यांपेक्षा थोडेसे मोठे आहेत. त्यामुळे अत्यंत वक्राकार आणि अरुंद जागेतून ही गाडी जात असता गाडीच्या डब्याला नुकसान पोहोचण्याची शक्यता आहे, असे मध्य रेल्वेतील एका अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले. गाडय़ांची देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी असलेल्या विशेष मार्गिकांना पीटलाइन म्हणतात. दादर आणि मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे येणाऱ्या गाडय़ा देखभाल दुरुस्तीसाठी अनुक्रमे दादर आणि वाडीबंदर व माझगाव येथील पीटलाइनमध्ये जातात. या तीनही ठिकाणी पीटलाइन वक्राकार आहे. त्यामुळे या गाडय़ा येथे येऊ शकत नाहीत, असेही त्याने स्पष्ट केले.
त्यामुळे सुरुवातीपासूनच मध्य रेल्वेने ही गाडी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसऐवजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणाऱ्या नव्या तीन गाडय़ांना हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. त्याशिवाय या ठिकाणाहून सुटणाऱ्या आणि येथे देखभाल-दुरुस्तीसाठी असलेल्या गाडय़ांची संख्याही प्रचंड आहे. परिणामी नव्या डबलडेकर गाडीची देखभाल दुरुस्ती येथे शक्य नाही. म्हणूनच मध्य रेल्वेला ही गाडी आपल्याकडे ठेवणे शक्य झाले नाही.