नवरात्रोत्सवाचे वेध लागले तसे शहर परिसरातील देवी मंदिराच्या सजावटींनी वेग धरला आहे. नाशिकचे ग्रामदैवत श्री कालिका माता मंदिरही नवरात्रोत्सवासाठी कात टाकत असून यंदा या सजावटीला पाश्चात्त्य किनार लाभली आहे. कोरिया येथून मागविलेल्या साहित्यातून गाभाऱ्यासह दर्शनी भाग आकर्षक पद्धतीने सजविला जात असून मंदिराला सुवर्णझळाळी प्राप्त होत आहे. नवरात्रोत्सवात श्री कालिका माता मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते. विश्वस्तांकडून भाविकांची श्रद्धा, मंदिराचे माहात्म्य लक्षात घेत या काळात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. नवरात्रोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर, स्वच्छतेसोबत मंदिर सजावटीवर विश्वस्त मंडळाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी कोरियामधून खास पत्रा मागविण्यात आला आहे. ७०० रुपये चौरस फूट दराने घेण्यात आलेल्या सोनेरी पत्र्यावर भारतीय पद्धतीने नक्षीकाम सुरू आहे. सुरुवातीला मंदिराचा गाभारा, मूर्तीच्या आसपासच्या भागात सजावट करण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात मंदिराच्या दर्शनी भागातील छप्पर, तसेच गाभाऱ्यातील प्रवेशद्वारावर काम सुरू करण्यात आले आहे. यासाठी जवळपास ४० लाखांहून अधिक खर्च अपेक्षित असल्याचे मंदिराचे विश्वस्त अण्णा पाटील यांनी सांगितले. हे काम पूर्ण झाल्यानंतर मंदिराला सुवर्ण झळाळी प्राप्त होणार आहे. दुसरीकडे, मंदिर आवारात रंगरंगोटीसह विद्युत रोषणाईचे काम सुरू आहे. छोटय़ा-मोठय़ा व्यावसायिकांकडून गाळे बांधण्याच्या कामाला वेग आला आहे. पोलीस तसेच मंदिर व्यवस्थापनाकडून सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसी टीव्ही यंत्रणा व सुरक्षारक्षक याचेही नियोजन केले जात आहे.