रायगड जिल्हा परिषदेने पनवेल तालुक्यातील नावडे येथे आयोजित केलेला कृषी मेळावा शेतकऱ्यांना मार्गदर्शनपरठरला. हा मेळावा जिल्ह्य़ातील विविध तालुक्यांतील प्रयोगशील शेतकऱ्यांचे व्यासपीठ ठरले. रायगड जिल्हा भात व मासे यांसाठी प्रसिद्ध असताना येथे फूल, हळद यांच्यासारखी सेंद्रिय शेती करणारे शेतकऱ्यांच्या उत्पादनाने या मेळाव्याला वेगळेपण आणले होते. रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अरविंद म्हात्रे यांचा नावडे हा मतदारसंघ असल्याने हा मेळावा येथे म्हात्रे यांनी आयोजित केला, मात्र त्यामुळे पनवेलच्या आधुनिक शेतकऱ्यांना या कृषीक्षेत्रातील रायगड अजून जवळून पाहता आला.
माणगाव तालुक्यातील माल्य (लिंबूची जात), स्ट्रॉबेरी हेसुद्धा आकर्षण ठरले. सुधागड पाली तालुक्यातील उत्तम पाटील यांच्या पॉलीहाऊसमधील जरबेरा, कारनेशन व याच तालुक्यातील जांभूळपाडा येथील विजय अभ्यंकर यांनी पिकवलेली निशिगंधा, सिमला मिरची या वैशिष्टय़पूर्ण पिकाची येथे शेतकरी माहिती घेत होते. पनवेल तालुक्यातील कसळखंड गावातील कमलाकर घरत व कलावती घरत या दाम्पत्याने उत्पादित केलेल्या तांदळाने सर्व स्टॉलची गर्दी आपल्याकडे खेचली होती. या वेळी साई, जया, रत्ना, एचएमटी, सह्य़ाद्री, वैष्णवी, कर्जत ७, कोलम व इंद्रायणी या जातींचे पनवेलच्या महागडय़ा जमिनीवर आजही भरघोस उत्पादन घेतले जाते याचे उत्तम उदाहरण असणारा घरत कुटुंबीयांचा हा स्टॉल होता. या मेळाव्यात तळकोकणातील वैभववाडी येथील कृष्णा संभाजी राजे या राज्य सरकारच्या शेतकी सन्मानपत्र विजेत्या शेतकऱ्याने मांडलेल्या स्टॉलवरील विविध मसाले, हळद व डाळींचा सर्वात जास्त खप झाला. दोन दिवसांत सुमारे २८ हजार रुपयांचा माल हातोहात विकला गेला. राजे हे पुर्णपणे सेंद्रिय शेती करतात. या मेळाव्यात विविध बी-बियाने, रोगांवरील खते, तसेच सेंद्रिय शेतीचे महत्त्व शेतकऱ्यांना अनेक मान्यवरांनी पटवून दिले. झटपट शेतीपेक्षा जमिनीची सुपिकता व कस टिकविणारी शेती शेतकऱ्याच्या भविष्यासाठी फायदेशीर असते, असे मत येथे अनेक व्याख्यात्यांनी मांडले.

११.५ किलोचे कलिंगड लक्षवेधक
रोहा येथील राकेश लोखंडे या शेतकऱ्यांनी पिकवलेले ११.५ किलो वजनाचे कलिंगड येथे सर्वाचे लक्ष वेधणारे ठरले. लोखंडे हे रोहा येथील आंबेवाडी गावचे आहेत. त्यांनी ३० एकर जमिनीत कलिंगडाचे पीक घेतले आहे. तसेच याच तालुक्यातील हरीश दाणी यांनी १५ एकर जमिनीवर केलेल्या केळी लागवडीमधील एक घड ४० किलो वजनाचा होता.