सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येणार असल्याने भाविकांच्या सोयीसाठी कुंभमेळ्यानिमित्त विशेष रेल्वेगाडी सुरू करण्यासंदर्भात लवकरच रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्ह्य़ाचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. मुंबई येथे मंत्रालयात महाजन यांच्या दालनात सिंहस्थानिमित्त नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे करण्यात येणाऱ्या सुशोभीकरण कामाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
सिंहस्थ अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपल्याने सर्वच स्तरांवर कामांना गती देण्यात येत आहे. या पाश्र्वभूमीवर आयोजित या बैठकीत महाजन यांनी विविध कामांचा आढावा घेतला. सिंहस्थासाठी बसमार्फत भाविकांची ने-आण करण्याची व्यवस्था राज्य परिवहन महामंडळामार्फत करण्यात येणार असली तरी रेल्वेद्वारे येणाऱ्या भाविकांची संख्या अधिक राहणार आहे. त्यानिमित्त नाशिक रोड रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण करण्याचे काम सुरू झाले असले तरी अनेक सुविधा अद्याप बाकी आहेत. सिंहस्थात नाशिककडे येणाऱ्या भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता त्यांची ने-आण करण्यासाठी विशेष रेल्वेगाडीची व्यवस्था करणे भाग आहे. त्या संदर्भात लवकरच महाजन हे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याशी चर्चा करणार आहेत.
दरम्यान, नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे सुरू असलेल्या कामांचा वेग पाहता ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होण्याची शक्यता कमी वाटत असल्याने महाजन यांनी या बैठकीत पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
भाविकांसाठी रस्ते आणि इतर सुविधा पुरविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अधिक प्रयत्न करण्याची गरज आहे. या कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिककडे संपूर्ण जगाचे लक्ष असल्याने त्याच्या प्रसिद्धीकडे लक्ष देण्याची आवश्यकताही महाजन यांनी मांडली. शहरातील सुशोभीकरणाचे काम अधिक आकर्षक पद्धतीने होण्याची गरज आहे.
राज्याची कला, संस्कृती आणि परंपरा यांचे दर्शन संपूर्ण जगाला दाखविण्याची ही अनोखी संधी आहे. या संधीचा योग्य वापर करण्यासाठी राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाने प्रयत्न करावेत, असेही महाजन यांनी सांगितले. या वेळी कुंभमेळ्यानिमित्त सुशोभीकरणासाठी करण्यात येणाऱ्या विविध संकल्पनांचे सादरीकरण कला-दिग्दर्शक नितीन देसाई, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या वतीने करण्यात आले.
सिंहस्थाच्या कामांना वेग देण्यात आला असला तरी पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण होतील किंवा नाही याविषयी साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये रस्त्यांच्या कामांना आता कुठे सुरुवात करण्यात आली आहे.
रस्ता-रुंदीकरणात येणारे बांधकाम हटविण्यास स्थानिक रहिवाशांनी विरोध केला होता. त्यामुळे या कामास उशीर झाला. हा विरोध निवळल्यानंतर रस्ता रुंदीकरण कामास सुरुवात करण्यात आली आहे. संपूर्ण त्र्यंबकेश्वरमध्ये त्यामुळे सध्या ठिकठिकाणी उखडलेल्या रस्त्यांचे दर्शन होत आहे. पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्याच्या घाईचा परिणाम कामाच्या दर्जावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नाशिक शहरातही हीच स्थिती असून बहुतांश रस्त्यांचे डांबरीकरण पूर्ण करण्यात आले असले तरी रस्ता रुंदीकरणाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. गोदावरीवर असलेल्या सर्वच पुलांच्या दुरुस्तीचे काम अद्याप बाकी आहे.
जुने नासिक आणि पंचवटी यांना जोडणाऱ्या दहिपुलावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून वाहनधारकांना पुलावरून जाताना एखाद्या खेडय़ातील रस्त्यावरून जात असल्याचा भास होतो. त्यामुळे सिंहस्थाआधी या पुलाची दुरुस्ती आवश्यक आहे. पावसाळ्यापूर्वी ही सर्व कामे पूर्ण करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनाला पेलवणार आहे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या बैठकीस मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अवर मुख्य सचिव आनंद कुलकर्णी, आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव सुजाता सौनिक, नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर, नाशिक विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम आदी उपस्थित होते.