कुर्ला स्टेशन ते लालबहादूर शास्त्री मार्गावरून वांद्रे-कुर्ला संकुलाकडे (बीकेसी) जाण्यासाठी वाहनचालकांना कुर्ला डेपोला वळसा घालत जाण्याचा त्रास आता वाचणार आहे. कुर्ला स्थानकापासून बर्वे मार्ग ते वांद्रे-कुर्ला संकुलाच्या प्रवेशरस्त्यापर्यंतच्या नवीन रस्त्याचा प्रकल्प हाती घेण्यात येत असून त्यासाठी २५ कोटींचा खर्च येणार आहे.कुर्ला स्टेशन पश्चिम ते ‘बीकेसी’च्या एलबीएस मार्गावर जाण्यासाठी वाहनचालकांना एसजी बर्वे मार्गावरील कुर्ला डेपोला वळसा घालणे क्रमप्राप्त होते. कुर्ला मार्केट येथील लियाकत अली मार्गावरील डेव्हिड चाळ येथील २२११ चौरस मीटर क्षेत्रफळ असलेली जागा हा अडथळा ठरत होता. आजमितीस या रस्त्यावर वाहतुकीचा प्रचंड खोळंबा होतो. ‘बीकेसी’कडे जाणाऱ्या आणि तेथून येणाऱ्या वाहनांचा वेळ आणि इंधन दोन्ही वाया जाते. त्यामुळे बर्वे मार्ग ते एलबीएस मार्गावरील ‘बीकेसी’चे प्रवेशद्वार असा रस्ता बांधण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली होती.पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी त्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला. प्रशासनाने प्रस्ताव तयार करून पालिकेकडे मंजुरीसाठी पाठवला होता. रस्त्यासाठी भूसंपादनाची गरज होती. त्यासाठी सुधार समितीने मंजुरी दिली आहे. त्यामुळे नवीन रस्त्याच्या कामाला चालना मिळाली आहे.हा रस्ता झाल्यावर वाहनचालकांचा दोन किलोमीटरचा वळसा वाचणार आहे. कुर्ला स्थानकावरून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरात बीकेसीच्या प्रवेश मार्गावर पोहोचता येणार आहे.