शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) योग्य उपचार मिळत नसल्याची नागरिकांची ओरड असतानाच आता ठिकठिकाणी असलेले घाणीचे साम्राज्य, पिण्याच्या पाण्याची नसलेली सोय आणि रस्त्यातच उभ्या असलेल्या वाहनांचा सामना येथे दररोज येणारे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना करावा लागत आहे. त्यामुळे ऐकेकाळी गरीब व मध्यमवर्गीयाचे आशास्थान असलेल्या मेडिकलच्या बाबतीत ‘कुठे नेऊन ठेवले मेडिकल माझे’, अशी म्हणण्याची पाळी सामान्य नागरिकांवर आली आहे. 

14
एकेकाळी समाजातील गरीब व मध्यमवर्गीयांचे मेडिकल हे आशास्थानच नव्हे तर श्रद्धास्थान होते. आता ही भावना लयाला जात असली तरी गरीब व सामान्य नागरिकांना मेडिकलशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आपण काहीही केले आणि कसेही वागले तरी सामान्य नागरिक येथे उपचारासाठी येतातच, असा ठाम विश्वास मेडिकलच्या प्रशासनाला वाटत असावा. त्यामुळेच की काय येथे दररोज अनेक समस्या निर्माण होत आहे. या समस्या सोडवण्यापेक्षा येथील प्रशासनातील अधिकारी आणि डॉक्टर्स राजकारणच करण्यात गुंतलेले दिसून येते. रुग्णांना योग्य उपचार मिळावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचा दावा प्रशासन करीत असले तरी येथे येणारे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. येथील येणारे अनुभव पाहूनच येथून घरी परत जाणारा रुग्ण मरणाला सामोरे जातो, पण मेडिकलला जाऊ नको, असा सल्ला दुसऱ्या रुग्णाला देतात ते उगीच नव्हे, असे आता वाटायला लागले आहे.
रुग्ण आकस्मिक विभागात आल्यानंतर त्याची वेळेवर योग्य तपासणी होईलच, याची कुठलीही शाश्वती नाही. येथे आल्यानंतरच त्याला पहिला वाईट अनुभव येतो. हे दिव्य पार पाडल्यानंतर रुग्ण कदाचित वार्डात भरती झालाच तर मग समस्याला पारावर उरत नाही. ऐकेकाळी मेडिकलचे मुख्यद्वार मोकळे राहात होते. आता या दारापुढे एवढय़ा मोठय़ा संख्येने दुचाकी वाहने असतात की, त्यातून मेडिकलमध्ये प्रवेश करावा कसा, असा प्रश्न रुग्ण व रुग्णाच्या नातेवाईकांना पडतो. विशेष म्हणजे आकस्मिक विभागाच्या बाजूला पार्कीगची व्यवस्था करण्यात आली आहे. असे असतानाही मेडिकलमध्ये येणारे डॉक्टर्स, कर्मचारी व काही अन्य नागरिक आपली वाहने मुख्य दाराच्या पुढे उभी करतात. त्यामुळे मेडिकलच्या सौंदर्यालाच बाधा पोहचत आहे. हे दृष्य पाहून तर ‘कुठे नेऊन ठेवले मेडिकल माझे’ असे उद्गार तोंडातून बाहेर पडतात.
मेडिकलमध्ये रुग्णांना पिण्याच्या पाण्यासाठी वनवन फिरावे लागते. प्रत्येक रुग्ण व त्यांचे नातेवाईक पिण्याच्या पाण्याच्या बॉटलस् खरेदी करू शकत नाही. रुग्णालयाच्या मुख्य दाराशेजारी सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु तेथे पाणी घेण्यासाठी उभेही राहता येत नाही. येथे चक्क नाली खोदून ठेवण्यात आली असून त्यात पाणी साचले आहे. तसेच कचराही साचला आहे. एवढेच नव्हे तर मेडिकलच्या परिसरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिग, फेकलेले उष्टे अन्न बघावयास मिळते. या घाणीचे वातावरण डासांच्या निर्मितीस पोषक आहे. त्यामुळेच परिसरात मोठय़ाप्रमाणात डास दिसून येतात. येथील वातावरणामुळे रुग्णाची प्रकृती ठीक होण्यापेक्षा आणखी खालावते. रुग्णासोबत असणारे त्यांचे नातेवाईक मात्र येथून परत जाताना अनेक आजार घेऊन जातात, असे अनुभव अनेक जण सांगतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: झाडू हाती घेऊन गांधी जयंतीच्या दिवशी ‘स्वच्छ भारत’ अभियान सुरू केले व या अभियानात देशातील नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यामुळे जेथे तेथे स्वच्छता अभियान राबवले जात आहे. याच पाश्र्वभूमीवर मेडिकलमध्येही स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या मोहिमेत एकाच दिवशी जवळपास तीनशे टन कचरा काढण्यात आला. त्याचे वृत्तही विविध वर्तमानपत्रात झळकले. परंतु नंतर मात्र ‘जैसे थे’ स्थिती झाली. आता आणखी मेडिकलमध्ये कायमची स्वच्छता मोहीम राबवण्याची गरज निर्माण झाली आहे.