शहरातील सिनेमॅक्स मल्टिप्लेक्स चित्रपटगृहात मराठी चित्रपटांच्या तिकिटावर लावण्यात आलेली सक्तीची ‘कॉम्बो’ योजना त्वरित रद्द करावी, तसेच मराठी चित्रपटांना दिली जाणारी दुय्यम दर्जाची वागणूक बंद करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने मंगळवारी सिनेमॅक्ससमोर आंदोलन करण्यात आले. तिकिटासोबत खाद्यपदार्थ व थंडपेय प्रेक्षकांच्या माथी मारण्याची पद्धत या चित्रपटगृहाने अवलंबिली  होती. मनविसेच्या आंदोलनानंतर दोन्ही मागण्या मान्य करत चित्रपटगृह व्यवस्थापनाने त्वरित अंमलबजावणीची तयारी दर्शविली आहे.
शहर परिसरातील सिनेमॅक्स मल्टिप्लेक्स चित्रपटगृहात शुक्रवारी ‘लय भारी’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. मल्टिप्लेक्सतर्फे या चित्रपटाच्या तिकिटांवर सक्तीने ‘कॉम्बो’ योजना लावण्यात आल्याच्या तक्रारी मनसेकडे आल्या होत्या. तसेच जादा पैसे आकारून हा चित्रपट ३ व ४ क्रमांकाच्या पडद्यावर दाखविण्यात येत आहे. हिंदी चित्रपटांच्या तुलनेत मराठी चित्रपटांना दुय्यम दर्जाचे स्थान देण्यात येत आहे. त्यात मराठी प्रेक्षकांना वेठीस धरून नाहक आर्थिक भरुदड सोसावा लागत आहे. त्याचा निषेध करण्यासाठी मनसेच्या विद्यार्थी सेनेतर्फे उंटवाडी रोडवरील सिटी सेंटर मॉलमधील सिनेमॅक्ससमोर निदर्शने करत घोषणाबाजी केली. याबाबत व्यवस्थापकांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला.
मात्र आंदोलनकर्ते ‘कॉम्बो’ योजना रद्द करा, मराठी चित्रपट एक क्रमांकाच्या पडद्यावर प्रदर्शित करावा, या भूमिकेवर ठाम राहिले. अखेर मल्टिप्लेक्सचे नाशिक विभागीय अध्यक्ष महेश कितुरे यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करण्यात आली. या विषयात मनसेचे आ. वसंत गिते यांनीही मध्यस्ती केली. चर्चेनंतर व्यवस्थापनाने आंदोलकांच्या मागण्या मान्य करत त्वरित अंमलबजावणीची तयारी दर्शविली. त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले असून पुन्हा मराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्सकडून दुय्यम दर्जाची वागणूक मिळाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शहराध्यक्ष मुके श शहाणे यांनी दिला.
या वेळी अ‍ॅड. अजिंक्य गिते, जय कोतवाल, सतीश सोनवणे, राकेश परदेशी आदी उपस्थित होते.