फटाक्यांचा दणदणाट.. फराळाची साग्रसंगीत मेजवानी.. झगमगत्या कपडय़ांचा पेहराव.. सप्तरंगांच्या उधळणीत नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात गुरुवारी लक्ष्मीपूजन उत्साहात साजरे झाले. आश्विन अमावस्येला साजऱ्या होणाऱ्या दीपोत्सवाला साज चढतो तो ‘लक्ष्मीपूजनाचा’. आमावस्या असली तरी विविधरंगी फटाक्यांच्या आतशबाजीने आसमंत उजळून निघाला आणि पाहणाऱ्याला लखलख चंदेरी तेजाच्या दुनियेचा प्रत्यय आला. दरम्यान, या दिवशी सायंकाळी खरेदीचा उत्साह काही अंशी ओसरल्याने गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या बाजारपेठेतील चहलपहल कमी झाली.
यंदा दीपावलीच्या सर्वच तिथी वेगवेगळ्या दिवशी आल्याने या सणाचा मुक्काम काहीसा लांबला. महिला वर्ग आणि तरुणाईने मग ‘होऊ द्या खर्च’चे धोरण स्वीकारत खरेदीचा धडाका लावला. लक्ष्मीपूजनाने या सगळ्यावर कडी करत सायंकाळी काहीसा अल्पविराम दिला. सकाळपासून ग्राहकांच्या गर्दीने बाजारपेठ फुलल्या होत्या. घरकुल, सोने, वाहने, इलेक्टॉनिक्स वस्तू, फर्निचर, गृहोपयोगी वस्तू या खरेदीत उत्साह पाहावयास मिळाला. दुपारनंतर गर्दीचा जोर काहीसा ओसरल्याने बाजारपेठा हळूहळू शांत होऊ लागल्या. दुसरीकडे व्यापारी वर्गाची लक्ष्मीपूजनाची तयारी सुरू झाली. मुहूर्त टळू नये यासाठी सगळ्यांची धडपड सुरू होती. बँक, व्यापारी आस्थापना, महापालिका अशा ठिकाणी दुपारी लक्ष्मीपूजनास प्राधान्य देण्यात आले. घरोघरी आपण प्राप्त वा संग्रह केलेल्या लक्ष्मीचे, पैसे, सुवर्ण-चांदी आभूषणे वा अन्य साहित्याचे सायंकाळी लक्ष्मीच्या आगमनाला म्हणजे तिन्हीसांजेला पूजन करण्याचा प्रघात आहे. पूजनापूर्वी घर तसेच व्यवसायाच्या ठिकाणची जागा यांची स्वच्छता महत्त्वाची. त्यानुसार घरोघरी गुरुवारी लक्ष्मीचे प्रतीक असलेल्या केरसुनीला लक्ष्मीस्वरूप मानत तिला लाह्य़ा-बत्ताशे, मिष्ठांन्नाचा नैवेद्य दाखविण्यात आला. व्यापारी वर्गानेही तयारी पूर्ण करत पारंपरिक पद्धतीने घरातील लक्ष्मीपूजनासोबत उद्योग व्यवसायाच्या ठिकाणी लक्ष्मीपूजन केले. यासाठी नववर्षांची वही-लेखणी, उद्योग व्यवसायातील साहित्य यांची पूजा अनेकांनी केली.
या वेळी मुख्य बाजारपेठेसह शहर परिसर आकाशकंदील, पणत्या, दिव्यांची आरास आणि आकर्षक विद्युत रोषणाई यामुळे उजळून निघाला. त्यात फटाक्यांच्या आतशबाजीची भर पडली. विधिवत लक्ष्मीपूजनानंतर साऱ्यांनी आपला मोर्चा फटाके फोडण्याकडे वळविला. एकाच वेळी हजार, दहा हजार फटाक्यांची लावलेली लड, आकाशात जात एकाच वेळी होणारे ‘सेव्हन शॉट’. रॉकेट आदी फटाक्यांच्या रोषणाईने अमावस्येला चंदेरी आभा प्राप्त झाली आणि पाहणाऱ्यांच्या डोळ्याचे पारणे फिटले.
नाशिक महानगरपालिकेच्या वतीने लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम मुख्यालयातील खजिना विभागात झाला. महापौर अशोक मुर्तडक, आशा मुर्तडक, आयुक्त सोनाली पोंक्षे-वायंगणकर, निरंजन वायंगणकर यांच्या हस्ते तिजोरीचे पूजन करण्यात आले. या वेळी उपमहापौर गुरूमित बग्गा, स्थायी सभापती अ‍ॅड. राहुल ढिकले आदी उपस्थित होते. दीपावलीचा आनंद अनुभवताना नववर्षांचे स्वागत भल्या पहाटे व्हावे या अनुषंगाने शहर परिसरातील अनेक संस्थांनी शुक्रवारी ‘पाडवा पहाट’चे आयोजन केले आहे. नवनिर्वाचित आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्यातर्फे प्रमोद महाजन उद्यान येथे मंजूषा पाटील कुलकर्णी यांच्या स्वरमैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. संस्कृतीच्या पिंपळपारावर सानिया पाटणकर यांचे शास्त्रीय गायन, एम्पथी फाऊंडेशन आणि बाबाज थिएटरच्या वतीने गंगापूर रस्त्यावरील आनंदवन येथे पंडित हृदयनाथ मंगेशकर, गायिका मीना परुळेकर यांची मैफल होईल. ऋतुरंग परिवारातर्फे सायंकाळी सहा वाजता सांज पाडव्याचे आयोजन करण्यात आले आहे. राजीवनगर येथेही युनिक ग्रुपच्या वतीने भगवती चौकात साडेपाच वाजता पाडवा पहाट मैफल होणार आहे.