शीव, प्रतीक्षानगर येथे शाळेचे आरक्षण असलेला ‘म्हाडा’चा भूखंड ताब्यात घेण्याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही मुंबई महानगरपालिकेने त्याप्रकरणी कार्यवाही न केल्याने हा भूखंड तसाच विनावापर पडून आहे. महापालिकेने तातडीने हा भूखंड ताब्यात घेऊन तेथे शाळा उभारावी, अशी मागणी होत आहे.
प्रतीक्षानगर येथे ‘म्हाडा’चा २४९६ चौरस मीटरचा भूखंड आहे. त्या भूखंडावर शाळेचे आरक्षण आहे. पण शाळा होण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने तो ताब्यात घेण्याची गरज आहे. ‘म्हाडा’च्या इमारती, संक्रमण शिबिरे यामुळे या परिसराची लोकसंख्या आता ७५ हजारांवर पोहोचली आहे. त्यामुळे या परिसरात शाळेची नितांत आवश्यकता आहे. तरीही महानगरपालिकेने हा भूखंड ताब्यात घेण्याबाबत उदासीनता दर्शवली आहे. सद्यस्थितीत या भागात दोन खासगी संस्थांच्या शाळा आहेत. पण तेथे फारशा मूलभूत सुविधा नसल्याने नवीन चांगल्या शाळेची गरज आहे. महानगरपालिकेने हा भूखंड ताब्यात घेऊन तेथे शाळा उभारण्याची कार्यवाही करावी. अन्यथा ‘म्हाडा’ला हा भूखंड देऊन टाकावा. म्हणजे एखाद्या संस्थेला हा भूखंड देऊन तेथे शाळा सुरू करता येईल, अशी मागणी ‘म्हाडा’च्या इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती प्रसाद लाड यांनी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे यांच्याकडे केली आहे. कुंटे यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन लाड यांना दिले आहे.