विस्तीर्ण खाडी परिसर लाभलेल्या ठाणे जिल्ह्य़ातील खाडीकिनाऱ्यांना भूमाफियांनी पुरते ग्रासले आहे. जिल्हा प्रशासनाच्या डोळ्यादेखत माणकोली, डोंबिवली, बाळकूम पट्टय़ात तिवरांच्या झाडांची बेसुमार तोड सुरूआहे. विशेष म्हणजे, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकांत याबाबत चर्चा होऊनही प्रशासकीय पातळीवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे तिवरे संरक्षणासाठी न्यायालयाने दिलेले आदेशही धाब्यावर बसवत ठाणे-नाशिक महामार्गावर तिवरांची कत्तल सुरू आहे.

– मुंबई-नाशिक महामार्गावर माणकोली भागात खाडी बुजवून तिवरांची विस्तीर्ण जंगले कापून काढण्याचे सत्र आजही सुरू आहे. खारेगाव टोलनाका ओलांडताच तिवरांच्या कत्तलीचे चित्र ठळकपणे दिसू लागते. मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर भागांतून डेब्रीजच्या गाडय़ा खाडीकिनारी रीत्या होत असून त्यावर प्रभावी कारवाई झालेली नाही.
– डोंबिवलीतील पश्चिम पट्टय़ात कोपर रेल्वेस्थानक परिसरात रेती माफिया सुसाट सुटले आहेत. गेल्या महिनाभरापासून या भागात खाडीकिनारी असलेल्या खारफुटी दिवसाढवळ्या हटवून अनधिकृतपणे रेती उपसा सुरू आहे. तिवरतोडीचे हे लोण रेल्वेमार्ग तसेच कोपर भागापर्यंत पसरले आहे. मोठागाव रेतीबंदर खाडीकिनारी खारफुटीच्या झाडांची तोड करून त्या भागावर मातीचे भराव टाकण्यात येत आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाचे याकडे साफ दुर्लक्ष झाले आहे.

पालकमंत्र्यांचे आदेशही धाब्यावर
– माणकोली, डोंबिवली भागांतील खाडीकिनाऱ्यांवर तिवरांची कत्तल सुरू असल्याचा मुद्दा यापूर्वी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निघाला होता. मुंबई-नाशिक महामार्गावर विशेषत: माणकोली पट्टय़ात खारफुटी बुजवून त्यावर उभारल्या जाणाऱ्या अनधिकृत बेटाचा मुद्दा विधान परिषदेचे आमदार निरंजन डावखरे यांनी मांडला होता. त्यावर ही कत्तल थांबवावी, असे आदेश तत्कालीन पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिले होते. याशिवाय यासंबंधीचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले होते. या अहवालाचे पुढे काहीच झालेले नाही. विद्यमान पालकमंत्री एकनाथ िशदे यांनीही खाडी बुजविण्याविरोधात कडक कारवाई करा, असे आदेश दिले आहेत. प्रत्यक्षात बाळकूम-कालेर भागातच खारफुटीची कत्तल सुरू असल्याच्या अनेक तक्रारी आहेत.