एके काळी तलावांचे शहर म्हणून ओळख असणाऱ्या ठाणे शहरातील अनेक तलाव आता अतिक्रमणामुळे नाहीसे होत आहेत. यात आता दिव्यातील एकमेव तलावाची भर पडत आहे. दिवा रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या या निसर्गनिर्मित तलावामध्ये मातीचा भराव टाकून गाळे उभारण्यात आले असून भूमाफियांच्या या कृत्याला एका स्थानिक राजकीय नेत्याचे पाठबळ असल्याचे समजते. त्यामुळे महापालिका अधिकाऱ्यांनीही मूग गिळून बघ्याची भूमिका घेतली आहे.
दिवा पूर्व विभागात रेल्वे स्थानकाजवळच असलेला एकमेव निसर्गनिर्मित तलाव एके काळी गावाचे भूषण होते. तलावाचे जतन करण्यासाठी महापालिकेने त्याच्या देखभाल व दुरुस्तीची कामे केली. तलावाच्या संरक्षक भिंती नव्याने बांधल्या. गेली काही वर्षे या तलावात गणेश आणि देवींच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते. महापालिकेच्या संकेतस्थळावरही या तलावाची नोंद आहे. असे असूनही हा तलाव आता अखेरची घटका मोजत असल्याचे चित्र आहे.
रेल्वे फाटकाजवळील रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार असल्याने या फाटकाजवळील मार्गावरील टपऱ्या पाठीमागे सरकवून उभारण्यात आल्या. त्यासाठी तलावात मातीचा भराव टाकून तिथे गाळे स्वरूपातील टपऱ्या उभारण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, तलावात उतरण्यासाठी असलेल्या पायऱ्या अक्षरश: मातीच्या भरावाने बुजवून टाकण्यात आल्या आहेत. याशिवाय तलावाला अगदी खेटूनच बांधकामे उभारण्यात आली आहेत. त्यामुळे बेकायदा बांधकामांमुळे नेहमीच चर्चेत राहिलेल्या दिव्यातील एकमेव तलावातही अतिक्रमण झाल्याचे स्पष्ट आहे. तलावात मातीचा भराव टाकून भूमाफियांनी गाळे उभारले असतानाही महापालिकेचा अतिक्रमण विभाग मात्र त्याकडे डोळेझाक करीत असल्याचे दिसून येते. तसेच या बेकायदा बांधकामाला एका राजकीय स्थानिक नेत्याचा वरदहस्त असून त्या नेत्याच्या दहशतीपोटी नागरिक या बांधकामाविरोधात तक्रार करण्यासाठी पुढे येत नसल्याचे चित्र आहे.