कल्याण शहराच्या दक्षिण दिशेला पत्रीपुलाजवळ प्रशस्त पसरलेली हिरवीगार नेतिवली टेकडी आता बेकायदा झोपडय़ा, चाळींनी वाकू लागली आहे. रेल्वेने मुंबईकडून कल्याण शहरात प्रवेश करताना शहराच्या प्रवेशद्वारावर ही निसर्गरम्य टेकडी यापूर्वी नागरिकांचे स्वागत करीत असे. याच टेकडीची पायथ्यापासून ते शेंडय़ापर्यंतची जमिन भूमाफिया, झोपडीदादा यांनी गिळंकृत करून टेकडीचे अस्तित्व संपुष्टात आणण्यास सुरूवात केली आहे. बांधकामासाठी सततचे खोदकाम, झोपडीतील सांडपाण्याचा जागीच होणारा निचरा, मलनि:स्सारणाच्या टाक्या, महापालिकेचे याच टेकडीवर असलेले हजारो लिटरचे जलशुध्दिकरण केंद्र या सततच्या भाराने नेतिवली टेकडी वाकत चालली आहे. नेतिवली टेकडीचा भाग कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अधिपत्याखाली येतो. या टेकडीवरील काही जमिन वन विभागाची आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांपर्यंत टेकडीचा पूर्व भाग झोपडय़ांनी व्यापला होता. मध्यंतरीच्या काळात मुंबई, ठाण्यात झोपडय़ांवर तेथील महापालिकांनी कारवाई केली. या कारवाईत बाधीत झोपडीधारकाने थेट नेतिवली टेकडीचा आधार घेऊन आपले बस्तान बसवले. नेतिवली टेकडीवर ऑक्टोबरपासून ते जून अखेपर्यंत क्रमाक्रमाने भूमाफियांकडून झोपडय़ा बांधण्यात येतात. एका रात्रीत झोपडी बांधून मोकळे व्हायचे असे तंत्र येथे वापरले जाते. दहा ते पंधरा एकर परिसरात पसरलेली या टेकडीच्या माथ्यावर क्रांतिवीर वासुदेव फडके यांचे काही काळ वास्तव्य होते असे म्हणतात. या टेकडीच्या उत्तर बाजुला एक गुहा आहे. (मुंबईकडून येताना टेकडीवर लोकलमधून स्पष्ट दिसते.) दिवंगत नगरसेवक नंदकिशोर जोशी, सुधाताई साठे यांनी क्रांतिवीर फडके यांचे स्थान पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचे ठरवले होते. त्यांच्या निधनानंनतर हा प्रकल्प अपूर्ण राहिला. टेकडीवर झोपडय़ा, अतिक्रमणे कमी पडतात की काय म्हणून नियोजन नसलेल्या कल्याण डोंबिवली पालिकेने या टेकडीच्या आग्नेय बाजुला डोंबिवली शहराला पाणीपुरवठा करणारा हजारो लिटरचा पाणी साठा करणारा जलशुध्दिकरण प्रकल्प उभारला आहे. या बांधकामासाठी टेकडी मोठय़ा प्रमाणावर कापण्यात आली. या कामाचे हादरे टेकडीला बसले आहेत. टेकडीवरील वनराई भूमाफियांनी जमिनदोस्त केली आहे. आतापर्यंत टेकडीच्या पायथा, मध्यापर्यंत असलेल्या झोपडय़ा टेकडीला चारही बाजुने घेरून माथ्यापर्यंत पोहचल्या आहेत.
टेकडय़ा माफियांच्या घशात
नेतिवली टेकडीची जुळी बहिण म्हणजे कचोरे टेकडी. या टेकडीच्या बाजुला विकसकांची बहुमजली बांधकामे सुरू आहेत. या बांधकामांसाठी कचोरे टेकडीची माती वापरण्यात आली आहे. त्यामुळे सुळक्यापर्यंत ताठ मानेने उभी असलेली ही टेकडी बोथट झाली आहे. या टेकडीच्या एका बाजुने दगडी खदान, एमआयडीसी बाजुने अनधिकृत चाळी, झोपडय़ा उभारणीचे कामे माफियांकडून जोमाने सुरू आहेत. नेतिवली टेकडीच्या पायाचा आधार असलेली कचोरे टेकडी हळुहळु भूईसपाट होऊन नेतिवली टेकडीला धोका निर्माण होणार आहे. मोहने-आंबिवली परिसरात असलेली बल्याणी टेकडी भूमाफियांनी अनधिकृत चाळी बांधून स्वाहा केली आहे. या भागातील काही जमिन मालकांच्या जमिनी माफियांनी दहशतीने बळकावून जमिन मालकांना त्यांच्या जागेवर पाय ठेवण्यास मज्जाव केला आहे. गेल्या चार ते पाच वर्षांत पालिका हद्दीत सुमारे वीस ते तीस हजार अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत.

कल्याण शहराच्या पूर्व विभागातील नेतीवली टेकडीवरील वस्त्यांमध्ये सुमारे तीन हजारांहून अधिक घरे असून त्यात १५ हजारांहून अधिक लोक राहतात. त्यालगतच कचोरे परिसर असून तेथील अडीचशे झोपडय़ांमध्ये दोन हजारांहून अधिक नागरिक राहतात. २००५ च्या महाप्रलयकारी पावसानंतर या भागात दरड कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी कोणत्याही प्रकारची उपाययोजना महापालिका प्रशासनाने आखली नसल्याने येथील नागरिकांना जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे. गेल्या सहा वर्षांत टेकडीवर तीन वेळा दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.

संरक्षण भिंत कागदावरच..
नेतीवली टेकडी धोकादायक असून येथे वारंवार जमीन खचणे अथवा दरड कोसळण्याच्या घटना घडतात. त्यापासून या घरांचे संरक्षण व्हावे म्हणून भिंत बांधण्यात यावी, असा आग्रह या भागातील स्थानिकांनी धरला होता. २००९ मध्ये झालेल्या घटनेनंतर या विषयाकडे महापालिकेने लक्ष देत संरक्षण भिंत बांधण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सहा वर्षांत ही संरक्षण भिंत केवळ कागदावरच असल्याचे स्पष्ट झाले.    

नेतीवली टेकडीवरील दरड कोसळण्याच्या घटना
६ ऑक्टोबर २००९ – दरड कोसळल्याने १ ठार ४ जखमी
२४ जून २०१०  – दोन घरांवर दरड कोसळून ३ जण गंभीर जखमी
५ मार्च २०११ – जयभवानीनगरमध्ये दरड कोसळून ७ जण  जखमी