‘रेल्वे रूळ ओलांडण्यासाठी पुलाचा किंवा सबवेचा वापर करा.’, ‘गाडीच्या फुटबोर्डवरून प्रवास करू नका’, ‘चालत्या गाडीतून बाहेर डोकावणे धोकादायक आणि जीवघेणे ठरू शकते’, ‘रेल्वेच्या टपावरून प्रवास करू नका’ या आणि अशा असंख्य सूचना वारंवार कानांवर पडूनही मुंबईकरांनी कानांवर पडदे ओढल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. २०१४ या वर्षांत रेल्वे अपघातांत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ३४०० पेक्षाही जास्त आहे. तसेच याच कालावधीत या मार्गावर ३२००हून अधिक जण जखमी झाले आहेत. २०१३च्या तुलनेत ही संख्या कमी असली, तरी दर दिवसाला सरासरी १० मृत्यूंमुळे मुंबईकरांना अद्याप शहाणपणा आलेला नाही, हेच स्पष्ट होत आहे.
मुंबईच्या उपनगरीय रेल्वेमार्गावर होणाऱ्या अपघातांची संख्या २०१३ या वर्षांच्या तुलनेत २०१४मध्ये तब्बल १०० ने कमी झाली आहे. मात्र तरीही ही संख्या ३४२३ एवढी जास्त आहे. म्हणजेच दिवसाला सरासरी दहा लोक रेल्वे अपघातांत आपला जीव गमावतात आणि तेवढेच लोक जखमी होतात. रेल्वे पोलिसांच्या आकडेवारीनुसार यातील बहुतांश म्हणजेच १९१२ मृत्यू रेल्वे रूळ ओलांडताना झाले आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने पादचारी पूल, भुयारी मार्ग आदी गोष्टी यांचा अवलंब केला असला, तरी प्रवाशांनी अगदी काही सेकंदांचा वेळ वाचवण्यासाठी धोका पत्करण्याची तयारी दाखवली आहे.
रेल्वे रूळ ओलांडताना आलेल्या मृत्यूंच्या खालोखाल गाडीतून पडून होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाणही लक्षणीय आहे. फुटबोर्डवर किंवा दरवाज्यावर लोंबकळत प्रवास करण्याशिवाय मुंबईकरांकडे पर्याय नसतो. मात्र अशा प्रवासादरम्यान गाडीतून खाली पडून मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २०१४ या वर्षांत ७९७ एवढी होती. तर असा प्रवास करताना खांबाला धडक लागून मेलेल्यांची संख्या ११ एवढी आहे. गाडी आणि प्लॅटफॉर्म यांच्या पोकळीत पडून २०१४ या वर्षांत ३४ लोक दगावले. विशेष म्हणजे यातील अनेक मृत्यू धावत्या गाडीतून उतरताना किंवा धावत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न करताना झाले आहेत. या मृत्यूंखालोखाल प्रवासादरम्यान आलेल्या नैसर्गिक मृत्यूंचा आकडा जास्त आहे. प्रवासादरम्यान नैसर्गिक मृत्यू आलेल्यांची संख्या गेल्या वर्षांत ४६८ एवढी होती.

गेल्या वर्षी लोहमार्गावरील अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये ३००४ पुरुष आणि ४२१ महिला आहेत. यंदा २०१५मध्ये गेल्या २२ दिवसांत लोहमार्गावर १७५ पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले आहेत. हे अपघाती मृत्यू कसे टाळता येतील, यासाठी लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे एकत्रित विचार करत आहेत. मात्र प्रवाशांनीही नियमांचे पालन करून स्वत:चा जीव सुरक्षित ठेवावा, असे आवाहन रेल्वेतर्फे करण्यात आले आहे.

मरणास कारण की..
*  रूळ ओलांडणे  ११९२
*  गाडीतून पडून ७९४
*  खांबाला धडकून  ११
*  गॅपमध्ये पडून  ३४
*   विजेचा धक्का  २४
*  आत्महत्या  ३३
*  नैसर्गिक मृत्यू ४६८
*  इतर कारणे  १४४