स्थानिक स्वराज्य कर विभागाने गेल्या महिन्यात व्यापाऱ्यांच्या विरोधात केलेल्या कारवाईअंतर्गत २५ लाखांचा दंड वसूल करण्यात आला तर २२ दुकानांविरोधात कारवाई करण्यात आली होती. यापैकी १० प्रकरणे निकाली काढण्यात आले असून १२ प्रकरणाची तपासणी सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली.
महापालिकेच्या कार्यालयात कर आकारणी व कर संकलन समितीची बैठक गिरीश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली असून कर वसुलीवर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश देशमुख यांनी दिले. नागरिकांना कर भरण्यासाठी १०८ केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रामुळे कर वाढीची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कर विभागाने आतापर्यंत ७८ कोटी ७५ लाखांची वसुली केली. यावर्षी राज्य आणि केंद्र सरकारच्या शहरात ५ हजार ५९९ मालमत्ता आहेत. यातून ३३ कोटी ७१ लाखाची मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मागील महिन्यापर्यंत एलबीटी विभागाला २१७ कोटीचे उत्पन्न झाले.
मागील महिन्यात एलबीटी विभागाने १८ प्रतिष्ठानाची तपासणी केली तर त्यापैकी काहींवर कारवाई केली. १० प्रकरणे निकाली काढण्यात आली आहे तर १२ प्रकरणाची चौकशी सुरू आहे. रिकाम्या भूखंडाच्या मालकांना नोटीस देण्याचे निर्देश देशमुख यांनी दिले. बैठकीला उपसभापती दिव्या धुरडे, रश्मी फडणवीस, कांता लारोकार, अतिरिक्त उपायुक्त प्रमोद भुसारी, कर निर्धारक शशिकांत हस्तक, महेश मोरोणे, एलबीटी प्रमुख महेश धामेचा आदी अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, इतवारीमध्ये काही व्यापाऱ्यांवर कारवाई केली जात असल्यामुळे व्यापारी आणि कर विभागाचे अधिकारी यांच्यामध्ये वादावादी झाली. यावेळी इतवारीमध्ये दुकाने बंद करण्यात आली. नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने या कारवाईचा विरोध केला असून त्या संदर्भात महापौर अनिल सोले आणि आयुक्त श्याम वर्धने यांच्याकडे निवेदन दिले. व्यापाऱ्यांवर विनाकारण कारवाई केली जात असेल तर व्यापारी महापालिकेच्या विरोधात आंदोलन करेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.