इंधन दरवाढीमुळे वाढलेली महागाई आणि तृणमूल काँग्रेसचे खा. तापस पाल यांच्या वादग्रस्त विधान यांच्या निषेधार्थ डाव्या आघाडीच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी अचानक रास्ता रोको सुरू केल्यामुळे पोलीस यंत्रणेची धावपळ उडाली. या आंदोलनामुळे रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली.
शहरातील इतर काही संघटनांनी आंदोलनात सहभाग नोंदविला. आपल्या मागण्यांचे निवेदन आघाडीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. मोदी सरकारने सत्तेत येण्यापूर्वी ‘अच्छे दिन आयेंगे’ असे सांगत प्रचार केला. प्रत्यक्षात सत्तेत आल्यावर अवघ्या महिन्यात रेल्वेपाठोपाठ पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली. या दोन गोष्टीत भाववाढ झाल्यामुळे त्याचा परिणाम उर्वरित व्यवहारांवर होणार आहे. आधीच महागाईने त्रस्त असलेल्या नागरिकांवर भाववाढ लादण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला. यावेळी काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रस्त्यात ठाण मांडून केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. केंद्र सरकारने ही दरवाढ त्वरित मागे घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच तृणमूल काँग्रेसचे खा. तापस पाल यांनी मार्क्‍सवादी महिलांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा निषेध करून त्यांना त्वरित अटक करून मागणी करण्यात आली. आंदोलनात डॉ. डी. एल. कराड, अ‍ॅड. मनीष बस्ते, श्रीधर देशपांडे, राजू देसले यांच्यासह इतर पदाधिकारी सहभागी झाले होते.