संकटात सापडल्यानंतर कायमचे बंदिस्त होण्याची वेळ त्याच्यावरही आली होती. त्याला जीवापाड जपणाऱ्यांनी त्याला नुसते संकटातूनच सोडवले नाही, तर बंदिस्त होण्यापासून रोखले. त्यानेही मग कृतज्ञतेची नजर त्याला संकटातून सोडवणाऱ्यांवर टाकली आणि मोकळ्या हवेत श्वास घेण्यासाठी जंगलाच्या दिशेने धूम ठोकली.
खापा वनपरिक्षेत्रातील खरी पंजाबराव गावाच्या शेतातील कठडे नसलेल्या विहिरीत बिबट पडला. सकाळी शेतात गेलेल्या शेतमालकाला विहिरीत बिबट पडल्याचे दिसले. त्याने स्थानिक वनकार्यालयाकडे धाव घेतली. त्या कार्यालयात बचावपथक नसल्याने नागपूरहून या पथकाला पाचारण करण्यात आले. नागपूरचे मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते, सहाय्यक वनसंरक्षक वीरसेन, मेश्राम, वन्यजीवप्रेमी विनित अरोरा आणि वनखात्याची चमू दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास बचावाच्या सर्व साहित्यानिशी खरी पंजाबरावकडे रवाना झाली. तोपर्यंत या परिसरात गावकऱ्यांनी प्रचंड गर्दी केली होती.  गावकऱ्यांना रोखण्यासाठी पोलीस निरीक्षक यादव व त्यांची चमू त्या ठिकाणी पोहोचली. तासाभरात बचावपथकाची चमू घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी सर्व सूत्रे हाती घेतली. विहिरीची एक बाजू मोकळी सोडून सर्व बाजूने हिरवी जाळी लावण्यात आली. विहिरीत पाणी भरपूर असल्यामुळे बिबटय़ाला बेशुद्ध करता येत नव्हते. शेवटी खाटेला दोर बांधून खाट विहिरीत सोडण्यात आली. अवघ्या दोन वर्षांच्या या बिबटय़ाने क्षणभराचाही वेळ न दवडता खाटेवर उडी मारली. बचावपथकाच्या चमूने हळूहळू खाट वर ओढली आणि खाट वर येताच हिरव्या जाळीव्यतिरिक्त मोकळ्या असलेल्या विहिरीच्या एका बाजूने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली.
अवघ्या दीड तासात नागपुरातील या बचावपथकाच्या चमुने त्या बिबटय़ाला बंदिस्त न करता त्याच्या मूळ अधिवासात मोकळा श्वास घेण्यास मुक्त केले. गावकऱ्यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. मात्र, दोन-चार दिवस या परिसरात जाण्यास रोखून, या निर्णयामागचे कारण सांगितले. यावेळी गावकऱ्यांनीही त्यांचा हा निर्णय मान्य केला.
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या (एनटीसीए) नव्या नियमानुसार पिंजऱ्यात बंदिस्त केलेल्या बिबटय़ाला सहजासहजी जंगलात सोडता येत नाही. मानव-वन्यजीव संघर्षांत वनखात्याने जीवदान दिलेले अनेक बिबटे कित्येक वर्षांपासून बंदिवासातच आहेत. हा अनुभव लक्षात घेता या चमुने नवा प्रयोग केला. त्याला पिंजऱ्यात न घेता, जीवदान दिल्याबरोबर त्याच्या अधिवासात परत पाठवले.