दिवाळी हा सगळ्या समाजाचा सण असला तरी तो साजरा केला जातो व्यक्तिगत स्तरावरच. गणेशोत्सवासारखे त्याचे स्वरूप सार्वजनिक नाही. दिवाळी घरोघरी साजरी केली जाते. या पाश्र्वभूमीवर कुष्ठरोग्यांच्या वस्तीत मात्र संयुक्त पध्दतीने दिवाळी साजरी केली जाते. ही दिवाळी सर्व कुष्ठरोगी आणि कुष्ठरोगी पंचायत मिळून साजरे करतात. त्यामुळे जातीअंताच्या दृष्टिकोनातून सर्वधर्मियांच्या या दिवाळीला विशेष महत्त्व आहे.
ज्यांचे शरीरच नव्हे तर मनही जखमांनी दुखते आहे, अशी माणसे ज्यांना समाजाने आजही पूर्णपणे स्वीकारलेले नाही, अशा कुष्ठरोग्यांच्या वस्तीतही दिवाळी मोठय़ा उत्साहात साजरी होते. येथील कुष्ठरोगी विविध जाती धर्माचे आहेत. पण स्वातंत्र्यापूर्वी जेव्हा ही वसाहत स्थापन झाली तेव्हाच इथल्या लोकांनी जाती-पातीच्या भिंतीना तडे देऊन रोटी-बेटी व्यवहार सुरू केला होता.
लोकशाही पध्दतीने चालणारी एक स्वतंत्र पंचायतही त्यांनी स्थापन केली आहे. याच पंचायतीमार्फत सर्वच सण मोठय़ा उत्साहात साजरे केले जातात. लोकवर्गणी काढून वसाहतीतील काही महिला एकत्रित दिवाळीचे फराळ तयार करतात. त्यानंतर पंचायतीमध्ये लक्ष्मीपूजन करून त्याच ठिकाणी सार्वजनिक फराळाचा कार्यक्रम होत असतो.
मुंबईसह महाराष्ट्रात कुष्ठरोग्यांच्या शहराच्या ठिकाणी अशा ४५ वसाहती आहेत. आणि यासर्वच ठिकाणी अशीच प्रथा असल्याचे पंचायतीचे सरपंच बळीराम तांबडे सांगतात. आमच्या वसाहतीतील सर्वच तंटे पंचायतीमार्फतच सोडवले जातात. पोलीस ठाण्यापर्यंत जाणाऱ्या तंटय़ांचे प्रमाण अगदीच बोटावर मोजण्याइतके आहे. त्यामुळे तंटामुक्त वसाहत करण्याची संकल्पना यावर्षीच्या दिवाळीपासून राबवणार असल्याचे उपसरपंच रसुल मुल्ला यांनी सांगितले.
कुष्ठरोगी पंचायतीची संयुक्त दिवाळीची ही संकल्पना धडधाकटांच्या डोळ्यांत ऐक्याचे अंजन घालणारी आहे, हे नक्की.