गेल्या महिन्यात येथील बांधकाम (प्रॉपर्टी डिलिंग) व्यवसायात मोठय़ा उलाढाली झाल्या. काही नेत्यांनी मोठय़ा प्रमाणात जमिनी खरेदी केल्या, पण या व्यवहारात काही कोटी रुपयांचा सौदा हा व्हाईटमनीत करावा लागणार आहे. हीच मोठी अडचण सर्वासमोर येत आहे, तर दुसरीकडे खरेदी करण्यासाठी आवश्यक निधी काहींकडे नसल्याने हुंडीचिठ्ठी व्यवसायात यामुळे मोठे वादळ येण्याची चिन्हे आहेत. अकोल्यात लोकसंख्या वाढीचा दर नकारात्मक असल्याने याचा सर्वात मोठा फटका या व्यवसायाला बसण्याची चिन्हे आहेत.
गेल्या दशकातील अकोल्याच्या लोकसंख्या वाढीचा दर राज्याच्या तुलनेत बराच कमी आहे. राज्यातील काही बोटावर मोजल्या जाणाऱ्या जिल्ह्य़ात लोकसंख्या वाढीचा दर नकारात्मक असणाऱ्या जिल्ह्य़ात अकोल्याचा समावेश आहे. २००१ मध्ये अकोला जिल्ह्य़ाची लोकसंख्या सोळा लाख होती ती २०११ नुसार केवळ अठरा लाख इतकी असेल. शहरात ही वाढ एक लाखापेक्षा कमी असल्याची माहिती मिळाली. गेल्या पाच दशकांच्या तुलनेत लोकसंख्या वाढीचा दर २००१ ते २०११ या दशकात थेट निम्म्यावर आला. त्यामुळे याचा सर्वाधिक फटका या व्यवसायाला बसण्याची चिन्हे आहेत.
येथील काही नेत्यांनी त्यांच्या उन्नतीसाठी येथे जमिनीत टोकण देत काही सौदे केले, पण या सौद्यांना अंतिम स्वरूप देण्यासाठी काही कोटी रुपयांची रक्कम जुळविण्याची गरज आहे. यासंबंधीचा व्यवहार मुख्यत व्हाईटमनीत करावा लागणार असल्याने ती अडचण सर्वाना भेडसावत आहे. त्यामुळे काहींनी काळा पैसा उघड होऊ नये, या एकमेव उद्देशाने नको ती जमीन, असे म्हणत पाय काढण्याची तयारी सुरू केली आहे. या अडचणीमुळे येथील जमिनीचे काही कोटीचे व्यवहार आता थांबण्याची चिन्हे आहे. या सर्व प्रकारामुळे शहरातील जमिनीचे गगनाला भिडलेले भाव कोसळणार असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांनी स्पष्ट केले. काही जमिनींच्या व्यवहारात टोकन पध्दतीने दिलेला इसार पूर्ण करण्यास काहींची मोठी आर्थिक अडचण झाली आहे. याचा विपरीत परिणाम हुंडीचिठ्ठीवर होण्याची शक्यता या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केली.
अकोल्याच्या लोकसंख्या वाढीत घट झाल्याने येथे निर्माण होणाऱ्या नव्या सदनिकांची मागणी थंडावली आहे. मागणीपेक्षा सदनिकांचा पुरवठा अधिक असल्याचे चित्र येथे आहे. केवळ गुंतवणूक म्हणून होणारे व्यवहार झाले असून प्रत्यक्षात येथे राहण्यास कोणीच नसल्याने या गुंतवणुकीचा फायदा पुढील दशकात पदरी पडले, असा दावा जाणकारांनी केला.
शहरातील काही भागात केवळ निवृत्तीधारकांचे वास्तव असल्याने या भागातील इतरही व्यवसाय मंदावले आहेत. शहरानजीक जमिनींचे भाव गगनाला भिडले होते. तुर्तास या भागातील मागणी थंडावली. त्यामुळे या भागात खरेदी करून विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेले अनेकजण अडचणीत आहेत. त्यामुळे मिळेल त्या भावाने सौदे होत असल्याची माहिती मिळाली. शहरानजीक ग्रामीण भागात दलालांच्या दरांवर विश्वास न ठेवता प्रत्यक्षात खरेदी करणाऱ्यांनी विक्रेत्यांची भेट घेण्याची गरज आहे. घटलेली लोकसंख्या पाहता जमिनीत गुंतवणूक करणाऱ्यांनी सावधानता बाळगावी, अशी माहिती या क्षेत्रातील जाणकारांनी नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर दिली. जमिनीच्या भावात होणारी घसरण येत्या काळात अधिक स्पष्ट होईल, अशी माहिती आहे.