नवी मुंबई विमानतळ उभारणीच्या कामात अडथळा ठरलेल्या दहा गावांबरोबरच कुंडेवहाळ गावाजवळ असणाऱ्या १०८ मीटर उंच इमारतीच्या सपाटीकरणाला डिसेंबर अखेपर्यंत सुरुवात होणार असून सिडकोने या कामाची निविदा काढली आहे. टेकडीच्या सपाटीकरणासह तेथून निघणारी सहा ते सात हजार करोड मेट्रिक टन माती विमानतळ रणवेच्या जागेवर टाकण्याची जबाबदारी या कंत्राटदारांची राहणार आहे. टेकडीच्या या सपाटीकरणाबरोबरच माती उत्खन्नाचे गेली अनेक वर्षे राजकारण करणाऱ्या पनवेल उरण तालुक्यातील राजकीय नेत्यांच्या मनसुभ्यांचे डोंगर आता उभे राहणार आहेत. नवी मुंबई विमानतळाचा टेक ऑफ लवकर व्हावा यासाठी सिडको प्रयत्नशील आहे. या विमानतळाला एकूण २२६८ हेक्टर जमीन लागणार असून दहागावाखालील ६०० हेक्टर जमिनीचाही त्यात समावेश आहे. ही जमीन संमजस्यपणाने मिळावी यासाठी सिडको प्रशासन प्रयत्नशील असून त्यासाठी सरकारच्या सहमतीने विशेष पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. तो प्रकल्पग्रस्तांच्या पचनी पडावा यासाठी सिडको अनेक उपक्रम राबवीत आहे. तरीही प्रकल्पग्रस्तांचा त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत आहे. प्रकल्पग्रस्तांची समजूत काढण्याच्या या कामाबरोबरच सिडकोच्या ताब्यात असणाऱ्या सुमारे १५०० हेक्टर जमिनीवरील स्थापत्य कामे करण्याच्या
दृष्टीने सिडकोने हालचाली सुरू केल्या असून निविदा काढण्यास सुरुवात केली आहे. विमानतळाच्या मुख्य निविदेबरोबरच आता उलवा टेकडी सपाटीकरण करण्याची निविदा प्रसिद्ध झाली आहे. टेकडी सपाटीकरणाबरोबरच, मलनिस्सारण वाहिन्या, भराव यांचा या कामात समावेश आहे. एक हजार ५१५ कोटी रुपयांचे हे काम १८ महिन्यांत पूर्ण व्हावे अशी सिडकोची अपेक्षा असल्याची माहिती सिडकोचे मुख्य अभियंता संजय चौधरी यांनी दिली. या कामाची ६५ दिवसांनंतर निविदा दाखल केली जाणार असून त्यानंतर सपाटीकरणाच्या या कामाला सुरुवात होणार आहे. ही टेकडीच्या सपाटीकरणाची केंद्रीय पर्यावरण
मंत्रालयाकडून विशेष परवानगी घेण्यात आली असून विमानांच्या टेक ऑफ आणि लॅण्डिंगच्या मार्गात ती अडथळा ठरणारी आहे. टेकडीच्या सपाटीकरणातून निघणारी सहा ते सात हजार मेट्रीक टन माती खाडीभागाला बुजवण्यासाठी वापरली जाणार आहे. टेकडीच्या या सपाटीकरणाबरोबरच आता पनवेल उरण तालुक्यातील मातीचे राजकारण डोके वर काढणार असून त्यासाठी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, शेकापचे नेते या कामांसाठी हातमिळवणी करणार असून त्यांच्या इच्छा अपेक्षांचे इमले उभे राहणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.