केबीसी मल्टिट्रेडसारख्या राज्यात ४१ बनावट कंपन्या असून त्यांच्यामार्फत वेगवेगळी प्रलोभने दाखवून सुमारे १० लाख गुंतवणूकदारांकडून ५० हजार कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. त्यांची संपूर्ण माहिती सहा महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना देऊनही त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोप भाजपचे खा. किरीट सोमय्या यांनी केला. केबीसी घोटाळ्यात राज्यातील हजारो गुंतवणूकदारांचे हात पोळले गेले. या प्रकरणातील मुख्य संशयित भाऊसाहेब व त्याची पत्नी आरती चव्हाण सिंगापूरला पसार झाले आहेत. खा. सोमय्या यांनी सोमवारी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन तपास प्रक्रियेबाबत माहिती जाणून घेतली. तपासाबाबत समाधान व्यक्त करत सोमय्या यांनी मुख्य संशयित व त्यांनी परदेशात गुंतविलेले पैसे परत आणण्यासाठी केंद्र सरकारकडून आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, असेही नमूद केले.
अडीच ते तीन वर्षांत तिप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून केबीसी कंपनीने राज्यातील हजारो गुंतवणूकदारांकडून सुमारे पावणेदोनशे कोटी रुपये वसूल केल्याचे निष्पन्न झाले आहे. केबीसी कंपनीच्या घोटाळ्यात नाडल्या गेलेल्यांचा आकडा वाढत असल्याने या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. या प्रकरणी केबीसीचा संचालक बापूसाहेब चव्हाण, व्यवस्थापक पंकज शिंदे, कर्मचारी नितीन शिंदे, मुख्य संशयिताचा शालक निलंबित पोलीस संजय जगताप, संशयिताचा भाऊ नानासाहेब चव्हाण, साधना चव्हाण, भारती शिलेदार व कौसल्या जगताप या आठ जणांना अटक करण्यात आली आहे. केबीसीच्या संचालकांची ७३ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता व बँक खाती गोठविण्यात आली आहेत. या घोटाळ्यात नाडल्या गेलेल्या माय-लेकाने आत्महत्या केली तर एकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. या पाश्र्वभूमीवर, खा. सोमय्या यांनी सोमवारी सकाळी पोलीस आयुक्त कुलवंत कुमार सरंगल यांची भेट घेतली. साधारणत: अर्धा तास उभयतांनी चर्चा केली. या भेटीनंतर केबीसीच्या काही गुंतवणुकदारांनी सोमय्या यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली.
या वेळी पत्रकारांशी बोलताना सोमय्या यांनी नाशिक पोलिसांनी केबीसीच्या तपासावर पूर्ण पकड मिळवली असून त्यांचा तपास योग्य दिशेने सुरू असल्याचे सांगितले. मुख्य संशयित परदेशात पसार होण्यामागे पोलिसांचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरला काय, या प्रश्नावर सोमय्या यांनी आपल्याला मागे काय झाले त्यात जायचे नसल्याचे सांगून उत्तर देणे टाळले. भाऊसाहेब व पत्नी आरती चव्हाणला सिंगापूरहून आणण्यासाठी पोलिसांनी ‘रेड कॉर्नर’ नोटीस बजावली आहे. मुख्य संशयिताने केबीसीच्या पैशातून परदेशातून काही गुंतवणूक केली आहे काय याची छाननी केली जात आहे. संशयित व त्यांनी परदेशात गुंतविलेली रक्कम परत आणण्यासाठी केंद्र शासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य उपलब्ध करून दिले जाईल, असे आश्वासन सोमय्या यांनी तपास यंत्रणेला दिले. या प्रश्नावर सोमवारी दुपारी तीन वाजता आपण मुख्यमंत्र्यांचीही भेट घेणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.
राज्यात केबीसीसारख्या तब्बल ४१ बनावट कंपन्या स्थापण्यात आल्या आहेत. त्यांच्यामार्फत १० लाख गुंतवणुकदारांकडून तब्बल ५० हजार रुपये जमा करण्यात आले. या कंपन्यांच्या संशयास्पद कारभाराची सहा महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना माहिती देण्यात आली होती. परंतु, त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही, अशी तक्रारही सोमय्या यांनी केली.ू
भाजप स्थानिक पदाधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता
केबीसी प्रकरणाबाबत भाजपचे खा. किरीट सोमय्या यांनी सोमवारी सकाळी पोलीस आयुक्तांच्या भेटीची वेळ घेतली होती. सोमय्या यांच्यासमवेत भाजपचे स्थानिक पदाधिकारी सकाळी पोलीस आयुक्तालयात जमा झाले. उपमहापौर सतीश कुलकर्णी, शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, प्रदेश पदाधिकारी सीमा हिरे, माजी उपमहापौर देवयानी फरांदे आदी सोमय्यांसमवेत आयुक्तांच्या दालनात आसनस्थ झाले. काही वेळाने पोलीस आयुक्तांचे आगमन झाले. त्यांनी सोमय्या वगळता उर्वरित पदाधिकाऱ्यांनी बाहेर जाण्याचे सूचित केले. राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसाठी हा अनुभव तसा नवीन होता. एखाद्या नेत्याच्या नेतृत्वाखाली कुठेही शिरकाव करण्याची बहुतेक पदाधिकाऱ्यांची मानसिकता असते. पण, पोलीस आयुक्तालयात मात्र त्यांना शिरकाव करण्याऐवजी बाहेरचा रस्ता पकडावा लागला.