भारतीय भाषांमधले सर्वात मोठे शब्दकोडे तयार करून भारतात लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपल्या नावाची नोंद करण्याचा मान ६५ वर्षीय मनोरमा शिंत्रे यांनी मिळविला आहे. हा विक्रम करतानाच त्यांनी पुरुषी मक्तेदारी असलेल्या या क्षेत्रात सर्वात मोठे शब्दकोडे तयार करणारी जगातील पहिली महिला हा बहुमानही पटकावला आहे. विशेष म्हणजे याआधी मराठी भाषेतलं सर्वात मोठे शब्दकोडे तयार करण्याचा विक्रम त्यांचा मुलगा लेखक, दिग्दर्शक, अभिनेता मिलिंद शिंत्रे यांच्या नावावर होता. हा विक्रम त्यांनी मोडला आहे.
मनोरमा शिंत्रे यांनी तयार केलेल्या या शब्दकोडय़ात १६२५० चौकटी, ५८५९ शब्द, २९४५ आडवे शब्द आणि २९७४ उभे शब्द आहेत. हे शब्दकोडे तयार करण्यासाठी त्यांना ११ महिन्यांचा कालावधी लागला.
मनोरमा शिंत्रे यांना लहानपणापासूनच शब्दकोडय़ांची आवड होती.  हा वारसा त्यांना आई-वडिलांपासूनच मिळाला. तो त्यांनी कायम जोपासला आणि आपल्या मुलामध्येही रुजवला. वयाच्या ६३ व्या वर्षी त्यांनी शब्दकोडे तयार करण्याचे ठरवले. आणि दोन वर्षांत ते पूर्णत्वास नेले. सर्वात मोठे शब्दकोडे तयार करायचे तर कागदावर तयार करता येणार नाही, ही अडचण लक्षात घेता त्यांनी संगणकाची मदत घेण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी संगणकाचा कोर्स केला. संगणक हाताळण्याचा आत्मविश्वास निर्माण झाल्यावर त्यांनी त्यावर शब्दकोडे बनविण्यास सुरुवात केली.
एका खाजगी संस्थेत नोकरी सांभाळून रोज रात्री ८ ते २ असे पाच तास कोडे तयार करण्यासाठी त्या वेळ देत. सुट्टीचा दिवस तर त्यांनी या कोडय़ाच्या कामासाठीच राखून ठेवला होता. सलग ११ महिन्यांच्या कालावधीत त्यांनी भारतीय भाषांमधले हे सर्वात मोठे शब्दकोडे तयार केले.
लिम्का रेकॉर्डविषयी आपल्या भावना व्यक्त करताना मनोरमा शिंत्रे म्हणाल्या, ‘‘रिकामा वेळ सत्कारणी लावायचा म्हणून मी सहजच कोडी तयार करण्यास सुरुवात केली. तेव्हा रेकॉर्ड वगैरे करण्याचे ठरवले नव्हते. माझे कोडे जेव्हा १०० बाय १०० चे झाले तेव्हा माझ्या मुलाने आणखी मोठे कोडे तयार करण्यासाठी मला प्रोत्साहन दिले. आणि मीही नेमाने, जोमाने काम करायचे ठरवले. त्यासाठी विविध संदर्भ, परिचितांकडून माहिती गोळा करून माझे हे कोडे तयार झाले. शब्दकोडय़ांमध्ये मी रेकॉर्ड केले आहे हे जेव्हा मला कळले तेव्हा सुरुवातीला ‘त्या आपणच आहोत का?’ असा प्रस्न पडला. पण खरेच मी भारतात सर्वात मोठे शब्दकोडे तयार केले होते. मी सर्वात मोठे शब्दकोडे तयार करणारी जगातील पहिली महिला ठरले, याचा मला विशेष आनंद झाला आहे.