त्र्यंबकेश्वर देवस्थान येथे पूजा साहित्यामुळे होणारी रासायनिक झीज, सुरक्षितता तसेच भाविकांना दर्शनासाठी लागणारा वेळ या सर्व कारणांचा विचार करून एक मेपासून गर्भगृहातील प्रवेश मर्यादित करण्यात आला आहे. दिवसभरात सकाळी सहा ते सात या वेळेत गर्भगृहात प्रवेश करण्याची परवानगी असून भाविकांना कोणत्याही प्रकारचे पंचामृत किंवा इतर द्रव्य वाहता येणार नसल्याचा ठराव विश्वस्त मंडळातर्फे अलीकडेच मंजूर करण्यात आला असल्याची माहिती अध्यक्ष व्यंकटेश दौलताबादकर यांनी दिली.
भारतीय पुरातत्व विभागाने देवावर पंचामृत, गंध, अक्षदा टाकण्यात येत असल्याने प्रचंड झीज होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. देवस्थानातील पिंड आणि मूर्ती पुढील कित्येक पिढीपर्यंत अबाधित राहण्यासाठी पूजा साहित्य वाहण्यावर बंदी आणण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थानातील गर्भगृहाचा आकार अत्यंत लहान आहे. गर्भगृह खोल असून देवाचे दर्शन पायरीपर्यंत आल्याशिवाय होत नाही. भाविकांना गर्भगृहात सोवळे नेसून दर्शनासाठी जाणे आणि बाहेर परत येणे यात वेळ जात असल्याने त्याचा परिणाम रांगेतील इतर भाविकांना दर्शनापासून वंचित राहण्यावर होतो. याशिवाय गर्भगृहात जागा अत्यंत कमी असल्याने एकाच वेळेस अनेक भाविक गर्भगृहात थांबल्यास देव रांगेतील भाविकांना दिसणे अशक्य होते. त्यामुळे रांगेतील भाविकांच्या नाराजीलाही विश्वस्त मंडळींना तोंड देणे भाग पडते.
राज्य घटनेत प्रत्येकास समान अधिकार दिला असल्याचे गृहित धरले तर प्रत्येक भाविकाने सोवळे नेसून गाभाऱ्यात जाण्याचे ठरवले तर दिवसाकाठी फक्त दोन ते तीन हजार भाविकांनाच दर्शनाचा लाभ होऊ शकेल.
गर्भगृहात ये-जा करण्यास एकच दरवाजा आहे. कोणतीही खिडकी अथवा झरोका नाही. त्यामुळे गर्भगृहात गर्दी झाल्यास प्राणवायुचा पुरवठा कमी होऊन दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व कारणांचा विचार करून सुरक्षिततेच्या कारणासाठीही न्यासने हे निर्णय घेतले असून त्याची अंमलबजावणी शुक्रवारपासून होणार आहे.
भाविकांनी नियमांचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.