संपूर्ण लिंगायत समाजास ओबीसींचा दर्जा मिळावा, राज्यात या समाजास लोकसंख्येवर आधारित अल्पसंख्याक दर्जा द्यावा, त्याकरिता केंद्र शासनाकडे शिफारस करावी, आदी मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी लिंगायत समाज संघर्ष समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामुळे मध्यवर्ती भागातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली.
लिंगायत समाजाच्या आरक्षणासाठी संघर्ष समितीने मोर्चाचे आयोजन केले होते. वसंत नगरकर, अनिल चौघुले, बद्रीनाथ वाळेकर आदींच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चात मोठय़ा संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. लिंगायत समाजाच्या मागण्यांबाबत मागील महिन्यात मुंबई येथे धरणे आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. परंतु, त्या दृष्टीने अद्याप कार्यवाही झाली नसल्याची तक्रार मोर्चेकऱ्यांनी केली. राज्यात लिंगायत समाज प्रामुख्याने सोलापूर, कोल्हापूर, सांगली, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, नाशिक या जिल्ह्यांमध्ये विखुरलेला आहे. राज्यात अंदाजे ९० लाख इतक्या संख्येने हा समाज आहे.
लिंगायत समाजातील ज्यांना आरक्षण आहे, त्यांचे आरक्षण कायम ठेवून इतर संपूर्ण लिंगायत समाजास ओबीसींचा दर्जा मिळावा, राज्यात लोकसंख्येवर आधारित अल्पसंख्याक दर्जा देण्यात यावा, लिंगायत समाजाच्या नाशिक येथील स्मशानभूमीवरील अतिक्रमणे काढून त्या सुशोभित करण्याच्या दृष्टिकोनातून आर्थिक तरतूद करावी आदी मागण्यांचे निवेदन मोर्चेकऱ्यांनी जिल्हा प्रशासनास दिले.