उलवा, खारघर येथील ग्रामंपचायतीमध्ये दारूबंदीचे प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर आगरी-कोळी समाजात मोठय़ा प्रमाणात परिवर्तनाची लाट पसरू लागली असून, आता लग्न कार्यातील हळदी समारंभाला आवर घालण्यासाठी या समाजातील धुरिणांनी कंबर कसली आहे. त्यासाठी नुकत्याच झालेल्या कौपरखैरणे येथील एका बैठकीत ग्रामस्थांनी हळदी कार्यक्रमात होणाऱ्या मांसाहर आणि मद्यपानाला पायबंद घालण्याचा ठराव समंत केला. गेली दहा-पंधरा वर्षे या प्रकारचे ठराव मंजूर केले जात आहेत, पण ठराव मंजूर करणारे ग्रामस्थ स्वत:हून या प्रबोधन कार्यात भाग घेत नसल्याचा सूर काही ग्रामस्थांमधून उमटला.

आगरी-कोळी समाजातील हळदी कार्यक्रम प्रसिद्ध आहे. ठाणे रायगड जिल्ह्य़ात या कार्यक्रमावर एखाद्या लग्नासारखा खर्च केला जात असून, अनेक ठिकाणी मद्यपानामुळे भांडणे व खून, मारहाणीच्या घटना घडलेल्या आहेत. या समाजातील तरुण पिढीला आता हे नकोसे झाले असून, हळदी कार्यक्रमातील मद्यपान, मांसाहर आणि नाचगाणे यावर र्निबध घालण्यासाठी अनेक संस्था पुढे सरसावल्या आहेत. त्यात कल्याण-डोंबिवलीतील काही संस्थांनी पुढाकार घेतला आहे. पनवेलमध्येही अशा प्रकारे ग्रामस्थांनी हळदीचा झगमगाट कमी करण्याचे ठरविले आहे. दोन दिवसांपूर्वी उलवा सिडको क्षेत्रातील वहाळ ग्रामपंचायतीच्या सभेत दारूबंदीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. काही वर्षांपूर्वी खारघर ग्रामपंचायतीने याला आक्षेप घेतला होता. त्यामुळे खारघर परिसरात दारूचे दुकान नाही. आगरी-कोळी समाजात प्रबोधनाचे हे वारे फिरत असताना, गावातील माजी खेळाडूंसाठी फोर्टी फ्लस नावाने संघ स्थापन करून गावागावात क्रिकेटच्या सामन्यांचे आयोजन किंवा भाग घेणाऱ्या संस्थेने आता सामाजिक कार्यात पुढाकार घेतला आहे. आगरी कोळी समाजात होणारा हळदी कार्यक्रम आता टीकेचा विषय होऊ लागल्याने ग्रामस्थांनी आपल्या मुलांची लग्न साधेपणाने करण्याचे आवाहन करण्यात आले. यावर एका संस्थेच्या कार्याध्यक्षाने नाव न छापण्याच्या अटीवर टीका केली. असे ठराव गेली दहा-पंधरा वर्षे विविध संघटना मंजूर करीत आहेत, पण मांसाहार आणि मद्याच्या नशेत साजऱ्या होणाऱ्या हळदी कार्यक्रमात जाऊन तेथे प्रबोधन करण्याची हिंमत एकाही समाजधुरिणाने दाखविलेली नाही. त्यामुळ केवळ प्रसिद्धीसाठी असे ठराव केले जात असून, त्याच्या अंमलबजावणीचे काय, हा खरा प्रश्न आहे. त्यात नाण्याची दुसरी बाजू ही आहे, की समाजातील मुले आता शिकली आहेत. त्यांनाच त्यांच्या मित्रमैत्रिणींना हा झगमगाट दाखविण्यास लाज वाटत आहे. त्यामुळे त्यांनीच या हळदी पद्धतीला विरोध केला आहे. विशेष म्हणजे ठराव करणाऱ्या धुरिणांच्या घरात झालेली लगे्न, हळदी अशाच प्रकारे झालेली आहे हे ते हेतुपुरस्सर विसरलेले आहेत. त्यामुळे मांसाहर आणि मद्यबंदीचा हा ठराव कितपत यशस्वी होईल, याबाबत समाजातूनच साशंकता व्यक्त केली जात आहे.

दोन्ही समाजात असणाऱ्या या हळदीवर होणारा लाखो रुपये खर्च आणि त्यातील मद्यपान, मांसाहार याबाबत आम्ही १८ वर्षे प्रबोधन करीत आहोत. त्यात एक-दोन टक्के यश आले आहे. फोर्टी प्लसने सुरू केलेले हे प्रबोधनाचे कार्य आशावादी असून ते यशस्वी होईल. या प्रक्रियेत महिलांना अधिक त्रास सहन करावा लागत असल्याने त्यांचा विचार होणे आवश्यक आहे. महिलांना ही प्रथा आवडत नाही, पण त्यांची मर्जी कोणी लक्षात घेत नाही.
अ‍ॅड. पी. सी. पाटील, प्रकल्पग्रस्तांचे नेते