ठाणे महापालिकेतील हुल्लडबाज नगरसेवकांना आवर घालण्यासाठी यापुढे सर्वसाधारण सभेचे कामकाज दूरचित्रवाहिन्यांसाठी खुले करण्याचा विचार महापालिका स्तरावर सुरू झाला असून आपले वर्तन नागरिक पाहतील या भीतीने तरी सभागृहाचा नेहमीच आखाडा बनविणाऱ्या नगरसेवकांवर अंकुश राहू शकेल, असा विचार पुढे येऊ लागला आहे. शहराच्या नियोजनाच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे विषय पटलावर असताना गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत महापालिकेतील तथाकथित ज्येष्ठ नगरसेवकांनी बेशिस्तीचे नमुनेदार दर्शन घडविले. एकमेकांना धक्काबुक्की, शिवीगाळ करत अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकारही सभागृहात पाहायला मिळाले. वरचेवर होत असलेल्या अशा प्रकारांमुळे ठाणे महापालिकेच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली जाऊ लागली असून त्यावर अंकुश असावा यासाठी कठोर उपाययोजनांची गरज आता व्यक्त होऊ लागली आहे.
गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत ठाणे शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये डेंग्यूचा आजार बळावला या विषयावर सविस्तर चर्चा अपेक्षित होती. ठाण्यात येऊ घातलेले कॅन्सर रुग्णालय नेमके कोठे उभारावे, डायलेसिसची सेवा कशा प्रकारे पुरवावी, सिटी स्कॅन यंत्रणेचे स्वरूप कसे असेल, अशा स्वरूपाचे महत्त्वाचे प्रस्ताव विषय पटलावर असताना एकमेकांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ करण्यात नगरसेवक मश्गूल झाल्याचे चित्र दिसले. ठाण्यातील बाळकुम भागात विज्ञान केंद्र उभारण्याचा महत्त्वाचा प्रस्तावही या वेळी सभागृहात मांडण्यात आला होता. हे केंद्र मार्गी लागावे यासाठी डॉ. अनिल काकोडकर यांच्यासारख्या ज्येष्ठ वैज्ञानिकाने पुढाकार घेऊन ठाणे महापालिकेस सर्वप्रकारची मदत देऊ केली आहे. त्यामुळे विज्ञान केंद्राचा महत्त्वाचा प्रस्ताव जेवढय़ा लवकर मंजूर होईल तितक्याच वेगाने यासंबंधीची अंमलबजावणी शक्य होऊ शकणार आहे. आयुक्त असीम गुप्ता, शहर विकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी विज्ञान केंद्राच्या कामासाठी स्वत:ला जुंपून घेत असताना प्रस्ताव मंजुरीचे अधिकार असणाऱ्या सर्वसाधारण सभागृहात मात्र गुरुवारी नेमके ऊलट चित्र दिसले. कॅन्सर रुग्णालय, विज्ञान केंद्र अशा स्वरूपाचे महत्त्वाचे प्रस्ताव बाजूला सारत जवखेड येथील दलित हत्याकांडाचे राजकारण करत सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना भिडल्याने शहराच्या नियोजनाच्या अंगाने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या प्रस्तावांच्या मंजुरीसाठी आणखी महिनाभर वाट पाहावी लागणार आहे.
सर्वसाधारण सभागृहात प्रेक्षकांसाठी आरक्षित असलेली आसने ३० ते ४० आहेत. या आसनांवर नगरसेवकांचे बगलबच्चे आणि समर्थक कार्यकर्ते अनेकदा ठिय्या मांडून असतात. त्यामुळे एखाद्या नागरिकाला सभेचे कामकाज पाहायचे असेल तर बसावे कुठे हा प्रश्न कायम राहतो. लोकसभेसारख्या सर्वोच्च सभागृहाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्याची सुविधा उपलब्ध असताना ठाणे महापालिकेच्या सभागृहात मात्र छायाचित्रकार आणि दूरचित्रवाहिन्यांचे कॅमेरामन यांना प्रवेश नाही. याचे उत्तर अजूनही प्रशासनाने स्पष्टपणे दिलेले नाही. त्यामुळे महापालिकेच्या सभागृहातील कामकाजाचे थेट प्रक्षेपण किंवा छायाचित्रण करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशा स्वरूपाचा प्रस्ताव पुढे येऊ लागला असून यानिमित्ताने तरी नगरसेवकांच्या बेशिस्तीला आवर बसेल, असा मतप्रवाह एका मोठय़ा गटाकडून व्यक्त होत आहे. सभागृहातील कामकाजाचे छायाचित्रण करू देण्यास हरकत असण्याचे कारण नाही, असे मत सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी वृत्तान्तकडे व्यक्त केले. थेट प्रक्षेपण सुरू आहे म्हणून उत्साहाच्या भरात भाषणबाजीसुद्धा होता कामा नये, असे त्यांनी स्पष्ट केले.

महापौरांनी महापौरांसारखे वागावे
महापौरपद हे कोणत्याही एका पक्षाचे नसल्याने महापौरांनी महापौरांसारखे वर्तन केल्यास सभागृहात असे अनुचित प्रकार घडणार नाहीत, असे मत विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे यांनी व्यक्त केले. नेत्यांनी बाहेर दिलेले आदेश सभागृहात येऊन अमलात आणायचे एवढेच काय ते काम महापौरांना शिल्लक आहे. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने सभा चालविली जाते आणि असे प्रकार घडतात, असे त्यांनी स्पष्ट केले.- विरोधी पक्षनेते