पनवेल तालुक्यामधील खाडीकिनारी सुरू असणाऱ्या बेकायदा रेती उत्खननच्या ठिकाणी तहसीलदारांनी पहाटेच्या सुमारास धाड टाकून तीन डंपर व आठ ब्रास रेती जप्त केली.
गेल्या अनेक वर्षांपासून पनवेल तालुक्यातील जुई-कामोठे येथील खाडीकिनारी आणि कर्नाळाजवळील किनारपट्टीला हे रेती उत्खननाचे व्यवसाय जोरात सुरू होते. याची माहिती तहसीलदार दीपक आकडे यांना मिळाल्यानंतर त्यांनी पहाटे ६ वा. च्या सुमारास पोलिसांसह महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना न कळविता काही विश्वासू अधिकाऱ्यांच्या पथकांसह धाड टाकून ही कारवाई केली.
या कारवाईमध्ये जुई-कामोठे येथे दोन व कर्नाळा येथे एक असे तीन डंपर रेती भरलेले जप्त करण्यात आले. त्यामध्ये आठ ब्रास रेती होती अशी माहिती तहसीलदार आकडे यांनी दिली. खाडीतून ही रेती चार बोटीतून जुई-कामोठे येथे आणली जात होती. त्यानंतर सक्शन पंपाने ती येथील जेटीच्या किनाऱ्यावर वेगवेगळ्या पिटमध्ये ठेवली जात असे.
गाळ धुऊन झाल्यावर ही रेती विक्रीस जात असे अशी माहिती यावेळी देण्यात आली. या कारवाईत बाजारमूल्यानुसार पाच पट दंड या रेती वाहतूकदारांकडून वसूल करण्यात येणार आहे. डंपरमालकांना डंपर सोडविण्यासाठी ६० हजाराचा दंड ठोठावण्यात आला आहे.