राज्यातील काही भागात पूर्वी १६ ते १७ तास भारनियमन करण्यात येत होते. वीज निर्मिती केंद्रातील संयंत्रांची दुरुस्ती करून क्षमता वाढविल्यामुळे आता भारनियमन कमी करण्यात आले आहे, मात्र काही भागात वीज चोरीला आळा घालण्यासाठी, तसेच वीजग्राहक नियमित वीज बिल भरत नसल्यामुळे त्यांना शिस्त लागावी यासाठी भारनियमन करण्यात येत आहे, असे मत ऊर्जा राज्यमंत्री राजेन्द्र मुळक यांनी व्यक्त केले.
शनिवारी पुर्नरचित गतीमान विद्युत विकास सुधारणा योजनेअंतर्गत सिव्हील लाईनमधील प्रस्तावित ३३ केव्ही उपकेंद्राचे भूमिपूजन ऊर्जा राज्यमंत्री मुळक यांच्या हस्ते छोटा गोंदिया येथील भीमघाट परिसरात करण्यात आले यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष पुरुषोत्तम कटरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रजनी नागपुरे, जिल्हा महिला काँग्रेस कमेटीच्या अध्यक्ष उषा मेन्ढे, जिल्हा राईस मिल असोसिएशनचे अध्यक्ष गजानन अग्रवाल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती धनलाल ठाकरे, मनीष मेश्राम, शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष अशोक चौधरी, नगरसेवक विष्णू नागरीकर, वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता के.व्ही.अजनाळकर, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
मुळक म्हणाले, गोंदियातील बाजारपेठेअंतर्गत ५ कि.मी.पर्यंत भूमिगत वीजपुरवठा करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात येईल. नवीन वीजपुरवठा आराखडा अधिकाऱ्यांनी तयार करावा. या आराखडय़ालाही त्वरित मंजुरी देण्यात येईल. यात नवीन ट्रान्सफार्मर बसविण्यात यावे, असेही त्यांनी सूचविले. रावणवाडीचे इंडस्ट्रियल फिडर ४ महिन्यात सुरू करावे. त्यामुळे उद्योगांना भारनियमनातून मुक्ती मिळण्यास मदत होणार आहे. गोंदिया तालुक्यातील पथदिव्यांसाठी ९० लाख रुपये मंजूर केल्याचे सांगून मुळक म्हणाले, योग्य नियोजन करून निधीची मागणी केल्यास त्याला त्वरित मंजुरी देण्यात येईल. राज्यातील शेतकऱ्यांना कृषीपंपासाठी राज्य शासनाने ६५०० कोटी रुपयांचे अनुदान दिले असल्याचे सांगून जिल्ह्य़ातील प्रतीक्षा यादीवरील १५०० कृषीपंपांना वीज जोडणी त्वरित करण्याचे निर्देश मुळक यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिले. यावेळी मुख्य अभियंता के.व्ही.अजनाळकर यांनी  मार्गदर्शन केले. प्रास्ताविक अधीक्षक अभियंता अशोक फुलकर यांनी केले. संचालन अपूर्व अग्रवाल यांनी, तर आभार कार्यकारी अभियंता मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाला छोटा गोंदिया परिसरातील नागरिकांची बहुसंख्येने उपस्थिती होती. तसेच कटंगी रोड येथील प्रस्तावित ३३ केव्ही उपकेंद्राचे भूमिपूजनही ऊर्जा राज्यमंत्री राजेन्द्र मुळक यांनी केले.